ताज्या बातम्या

हातकणंगलेतील अंबप परिसरात गव्याचे दर्शन; शाळकरी विद्यार्थ्यांची धावपळ

Darshan of Gavya in Ambap area of ​​Hatkanangale; School students rush


By nisha patil - 1/17/2026 4:36:08 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील अंबप परिसरात आज सकाळी वन्यप्राणी गव्याने (रानरेडा) अचानक दर्शन दिल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. विशेषतः शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शाळेच्या मैदानात अचानक गव्याचा शिरकाव


आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास, अंबप येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मैदानात अचानक एक महाकाय गवा शिरला. त्यावेळी शाळेतील विद्यार्थी नेहमीप्रमाणे वर्गात अध्ययन करत होते. शाळेच्या परिसरात वन्यप्राणी आल्याचे लक्षात येताच शिक्षक व विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडाली. मात्र, शिक्षकांनी प्रसंगावधान राखत सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ वर्गात सुरक्षितपणे बसवून दारे बंद केली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.


गावात भीतीचे वातावरण, नागरिकांची धावपळ
गव्याच्या उपस्थितीची माहिती काही वेळातच गावात पसरली. शाळेच्या परिसरात आणि गावात नागरिकांची गर्दी झाली. गवा काही काळ मैदानातच थांबला होता. त्याच्या आक्रमक हालचाली पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वस्तीच्या भागात आणि शाळेसारख्या संवेदनशील ठिकाणी गवा आल्याने वनविभागाला तातडीने माहिती देण्यात आली.


पाडळीच्या दिशेने गव्याची वाटचाल
नागरिकांची गर्दी आणि गोंगाट वाढल्यामुळे गवा काही वेळाने बिथरला. मात्र, सुदैवाने त्याने कोणावरही हल्ला न करता शाळेच्या परिसरातून बाहेर पडत अंबप शिवार ओलांडून लगतच्या पाडळी (ता. हातकणंगले) गावाच्या दिशेने कूच केली.
गव्याने शेतीच्या दिशेने मोर्चा वळवल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

वनविभागाला सतर्कतेचे आवाहन
या घटनेमुळे परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी वनविभागाने गस्त वाढवावी आणि नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


हातकणंगलेतील अंबप परिसरात गव्याचे दर्शन; शाळकरी विद्यार्थ्यांची धावपळ
Total Views: 72