सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरू; मच्छीमार युवकांना मोठी संधी

Admissions Open for Marine Fisheries Training Program in Maharashtra
By nisha patil - 3/6/2026 12:58:06 PM
Share This News:

मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन’ या सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या 136 व्या सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण मुंबईतील वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात येणार असून इच्छुक मच्छीमार युवकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या प्रशिक्षणामध्ये नौकानयनाची मूलतत्त्वे, सागरी डिझेल इंजिनची देखभाल व दुरुस्ती, आधुनिक मासेमारी साधनांचा वापर तसेच सुरक्षित सागरी मत्स्यव्यवसायासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञानाचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी 1 जुलै 2026 ते 31 डिसेंबर 2026 असा असून दारिद्र्यरेषेखालील प्रशिक्षणार्थ्यांकडून प्रतिमहिना 100 रुपये तर इतर प्रशिक्षणार्थ्यांकडून 450 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांदरम्यान असणे, पोहता येणे, किमान चौथी उत्तीर्ण असणे आणि मासेमारीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच आधारकार्ड किंवा बायोमेट्रिक ओळखपत्र आणि संबंधित मच्छीमार संस्थेची शिफारस अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.

इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज 19 जून 2026 पर्यंत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई – 61 येथे सादर करावेत.

अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी विजय कोळगे (मो. 8779839743) आणि यांत्रिकी निर्देशक जयहिंद सुर्यवंशी (मो. 7507988552) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे किनारपट्टी भागातील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनण्यास मदत होणार आहे.