बॉडीगार्ड’ फेम दिग्दर्शक सिद्दिकी इस्माईल यांचं निधन

Bodyguard fame director Siddiqui Ismail passed away
By surekha - 9/8/2023 4:59:59 PM
Share This News:

बॉडीगार्ड’ फेम दिग्दर्शक सिद्दिकी इस्माईल यांचं निधन

 बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्दिकी इस्माईल यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही काळापासून ते न्युमोनिया आणि याकृतासंबंधित आजारांनी ग्रासलेले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोची येथील अमृता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे, सिद्दीकी यांना एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनच्या आधारावर ठेवण्यात आले होते. परंतु, अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
         दिग्दर्शक सिद्दिकी इस्माईल यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या मागे पत्नी सजिता आणि ३ मुली सुमाया, सारा आणि सकून असा परिवार आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही सिद्दिकी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांचे पार्थिव आज सकाळी नऊ वाजता कडवंथरा येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियममध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सिद्दीकी यांच्या पार्थिवावर सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
        सिद्दिकी इस्माईल यांनी अनेक मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. यामध्ये सलमान खानचा हिट चित्रपट ‘बॉडीगार्ड’चाही समावेश आहे. २०११मध्ये, सिद्दीकीने ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटामधून आपल्या दिग्दर्शनाची खोलवर छाप सोडली. ‘बॉडीगार्ड’ हा चित्रपट सलमानच्या कारकिर्दीतील हिट चित्रपट ठरला. सिद्दिकी यांनी ‘बॉडीगार्ड’ची तमिळ आवृत्ती 'कवलन'चेही दिग्दर्शन केले होते. त्यांनी 'काबुलीवाला', 'व्हिएतनाम कॉलनी', 'हरिहर नगर', 'गॉडफादर' या चित्रपटांचे त्यांनी यशस्वी दिग्दर्शन केले होते.