हॉर्नच्या आवाजावरुन मालकाने ओळखली चोरीला गेलेली दुचाकी

The owner recognized the stolen bike from the sound of the horn
By Administrator - 9/21/2023 6:43:05 PM
Share This News:

हॉर्नच्या आवाजावरुन मालकाने ओळखली चोरीला गेलेली दुचाकी

मागील काही दिवसांत दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. तर बीड शहरात आणि जिल्ह्यात देखील दुचाकी चोरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दरम्यान, वाहनांची चोरी करुन त्याचे पार्ट्स बदलून त्या गाड्या पुन्हा बाजारात विक्री केल्या जातात. त्यामुळे अनेकदा चोरीला गेलेल्या गाड्या पोलिसांच्या किंवा गाडीमालकांच्या लक्षात येत नाहीत. मात्र, बीडच्या  माजलगावात एका दुचाकीची चोरी केल्यावर चोराने गाडीत काही बदल करुन पुन्हा गाडी रस्त्यावर आणली. पण, याचवेळी दुचाकी चोराने रस्त्यावरुन जाताना गाडीचा हॉर्न वाजवला आणि त्यावरुन गाडी मालकाने आपली गाडी ओळखली. त्यामुळे या चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

माजलगाव शहरात राहणारे कन्हैयालाल ललवाणी यांनी 1 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता राजस्थानी मंगल कार्यालयाबाहेर आपली दुचाकी उभी केली होती. आपलं काम संपवून ते दोन वाजता जेव्हा मंगल कार्यालयाच्या बाहेर आले, तेव्हा त्यांना आपली गाडी आढळून आली नाही. तर, गाडी चोरीला गेल्याचा संशय आल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये चोरीच्या संदर्भात तक्रार केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी या दुचाकी चोराचा शोध सुरु केला होता.  
दरम्यान, ललवाणी यांची दुचाकी चोरट्याने चोरी केलेल्या गाडीत काही बदल केले. गाडीचे काही पार्ट्स बदलून घेतले. गाडीच्या वेगवेगळ्या बाजूने नवीन स्टिकर चिटकवले. तसेच गाडीच्या नंबर प्लेटला पांढरा रंग दिला. त्यामुळे चोरीची गाडी कोणालाही ओळखू येणार नसल्याचा त्याने सर्व प्रयत्न केले. त्यानंतर, ती गाडी घेऊन तो पुन्हा माजलगाव शहरात फिरु लागला. तर, याचवेळी तो ती गाडी घेऊन कन्हैयालाल लालवाणी यांच्या मुलाच्या जवळून गेला. तसेच यावेळी त्याने हॉर्न वाजवला. हॉर्नवरुन कन्हैयालाल लालवाणी यांच्या मुलाला संशय आला. तसेच गाडीचे फायरिंग देखील आपल्याच गाडीची असल्याची त्याची खात्री झाली. त्यामुळे याची माहिती त्याने तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी यावरुन संशयित तरुणाला दुचाकीसह ताब्यात घेतले. तसेच त्याला खाक्या दाखवताच चोरट्याने गाडी चोरीची कबुली दिली.