नवरा काळा असल्याने बायकोने पेट्रोल ओतून नवऱ्याला जाळले
By Administrator - 7/11/2023 3:24:16 PM
Share This News:
नवरा काळा असल्याने बायकोने पेट्रोल ओतून नवऱ्याला जाळले
हत्या करणाऱ्या पत्नीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
वार्ताहर
नवरा काळा असल्याने त्याची हत्या करणाऱ्या पत्नीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उत्तर प्रदेशातील संभलच्या जिल्हा न्यायालयाने खून करणाऱ्या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यासोबतच या महिलेला २५ हजार रुपयांचा दंड देखील आकारण्यात आला आहे. खरं तर संबंधित महिला गोरी होती तर तिचा नवरा काळा सावळा होता. यामुळे ती आपल्या पतीचा तिरस्कार करत होती. याच कारणावरून तिने १५ एप्रिल २०१९ रोजी पती झोपेत असताना त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. याप्रकरणी मृत पतीच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली
दरम्यान, पक्षकारांचे म्हणणे ऐकल्यानंतर आरोपी महिलेला शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून आणि पुरावे पाहिल्यानंतर न्यायालयाने आरोपी महिलेला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हे प्रकरण संभल जिल्ह्यातील कुधफतेहगढ पोलीस स्टेशन हद्दीतील बिचैता
गावातील असून स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय बनले आहे. गावातील रहिवासी हरवीर सिंगने पोलिसांत तक्रारदिली होती. तक्रारदाराची वहिनी प्रेमश्री हिने तिचा पती सत्यवीरला जाळून त्याची हत्या केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी प्रेमश्रीला अटक केली.
न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा पोलिसांनी आरोपी महिलेची चौकशी केली असता पोलिसांनाही धक्का बसला. आरोपी महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पती काळा होता म्हणून ती त्याचा तिरस्कार करत होती. याच रागातून एके दिवशी नवरा झोपला असता तिने गुपचूप त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी त्याला रुग्णालयात नेले, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
तक्रारदार हरवीरने सांगितले की, घटनेच्या वेळी तो वडिलांसोबत शेतात गेला होता. त्याचा भाऊ त्यावेळी घरी झोपला होता. मग त्याने घरी फोन करून त्याला चहा आणण्यास सांगितले. पण खूप वेळ झाला तरी भाऊ शेताकडे न आल्याने तो घरी आला अन् सर्व प्रकार समजला. वकील हरिओम प्रकाश उर्फ हरीश सैनी यांनी सांगितले की, घटनेशी संबंधित सर्व पुरावे आणि साक्षीदार न्यायालयात सादर केले आहेत, ज्याच्या आधारे न्यायालयाने प्रेमश्रीला दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आली.
|