बातम्या

नगरपंचायत प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम; कामे न झाल्यास २१ जुलैला भजन व ढोल-ताशांसह आंदोलनाचा इशारा

7days


By nisha patil - 7/15/2026 3:36:53 PM
Share This News:



नगरपंचायत प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम; कामे न झाल्यास २१ जुलैला भजन व ढोल-ताशांसह आंदोलनाचा इशारा

 

**आजरा (प्रतिनिधी) :** सामाजिक सेवा प्रतिष्ठान प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना प्रभाग क्रमांक ११ आणि १५ मधील प्रलंबित नागरी सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करणारे सविस्तर निवेदन देण्यात आले. सात दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास **२१ जुलै २०२६ रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर भजन, ढोल-ताशा आणि भारतीय बैठकीद्वारे शांततापूर्ण आंदोलन करण्यात येईल**, असा इशारा समितीने दिला आहे.

 

समितीने निवेदनात म्हटले आहे की, नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत यापूर्वी अनेक वेळा लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून समाधानकारक कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून केवळ आश्वासनांवर वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

निवेदनात भाई-भाई टॉकीज ते शिव कॉलनी आणि चाफे गल्ली ते सरकारी दवाखाना मार्गावरील खड्डे बुजविणे, मंजिरी परिसरातील बंद असलेले स्ट्रीट लाईट सुरू करणे, चराटी कॉलनी–आपटे कॉलनी येथील मुख्य पाणीपुरवठा लाईन बदलणे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, नवीन स्ट्रीट लाईट व सोलर लाईट बसविणे, रुक्मिणी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांची कामे, चर्च गल्लीतील पेव्हिंग ब्लॉक, रामदेव गल्लीतील रामाची विहीर स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करणे, विरंगुळा केंद्रासाठी मंजूर दोन गाळे उपलब्ध करून देणे, जोशी गल्लीतील मंजूर रस्त्याचे काम सुरू करणे तसेच गटारींची साफसफाई झाल्यानंतर २४ तासांत गाळ व कचरा उचलण्याची व्यवस्था करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

समितीने प्रशासनाला निवेदन मिळाल्यापासून सात दिवसांत कामांमध्ये प्रत्यक्ष प्रगती दिसावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा २१ जुलै रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर शांततापूर्ण आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तसेच आजरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत.

 

या निवेदनावर नगरसेवक तथा समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, नगरसेविका डॉ. स्मिता कुभार, गौरव देशपांडे, पांडुरंग सावरतकर, जावेदभाई पठाण, बंडोपंत चव्हाण, संजय जोशी, जोतिबा आजगेकर, मिनीन डिसोझा, रामचंद्र पंडित, सईद मुल्ला, संतोष बांदिवडेकर आणि अभिजित परीट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


नगरपंचायत प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम; कामे न झाल्यास २१ जुलैला भजन व ढोल-ताशांसह आंदोलनाचा इशारा
Total Views: 245