बातम्या
रोझरी इंग्लिश स्कूल,आजरा येथे विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम उत्साहात**
By nisha patil - 7/15/2026 3:42:19 PM
Share This News:
*रोझरी इंग्लिश स्कूल,आजरा येथे विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम उत्साहात**
**आजरा(हसन तकीलदार)*: रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ करिता विद्यार्थी मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवड करून नवनिर्वाचित प्रतिनिधींचा शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि लोकशाही मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात नव्या मंत्रिमंडळाला विविध विभागांच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.
यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमार अवनीश गवस व कुमारी श्रुती कुरूणकर यांची निवड करण्यात आली. शिस्तमंत्री म्हणून कुमार आदित्य कापसे, तर क्रीडामंत्री म्हणून कुमारी सेजल सावंत यांची निवड झाली. तसेच इतर विविध विभागांच्या प्रमुखांनाही त्यांच्या पदाची शपथ देण्यात आली.शिक्षिका सांचीझ डिसोझा यांनी सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींना शपथ देऊन त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांचे महत्त्व स्पष्ट केले.
यावेळी गतवर्षी उत्कृष्ट कार्य करणारे विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी शेरेल फर्नांडिस, कुमार क्लिंटन बार्देस्कर, कुमारी मायरा डिसोझा आणि कुमार स्वराज्यसिंह सरदेसाई यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नव्या मंत्रिमंडळाला योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फादर वॉल्विन फर्नांडिस, शाळेचे व्यवस्थापक फादर मेल्विन पायस, मुख्याध्यापक मनवेल बार्देस्कर तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याचा, नेतृत्वगुण विकसित करण्याचा आणि शाळेच्या प्रगतीसाठी सक्रिय योगदान देण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टीफन फर्नांडिस यांनी केले, तर एलिझाबेथ फर्नांडिस यांनी उपस्थितांचे आभार मानले.
रोझरी इंग्लिश स्कूल,आजरा येथे विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम उत्साहात**
|