बातम्या

शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी कामाला लागा : श्री.राजेश क्षीरसागर

Worked to make Shiv Senas National Convention a success


By nisha patil - 12/2/2024 6:08:31 PM
Share This News:शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी कामाला लागा : श्री.राजेश क्षीरसागर
  
मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक; दि.१५,१६,१७ फेब्रुवारीला महाअधिवेशन 

  
कोल्हापूर दि.१२ : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम होते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचेही कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेची घोडदौड सुरु आहे. शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये खंड पडला होता. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची प्रथा मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी पुन्हा सुरु केली आहे. मुंबई, ठाण्यानंतर शिवसेना आणि कोल्हापूर हे समीकरण तयार झाले आहे. गेल्या सहा महिन्यात शिवसेनेचे कोल्हापुरात झालेले सर्व कार्यक्रम शिवसैनिकांनी यशस्वी केले आहेत. त्याचमुळे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात होणार आहे. दि.१५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन होणार असून, दि.१७ फेब्रुवारी रोजी शिवसंवाद मेळाव्या अंतर्गत मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांची जाहीर सभा पार पडणार आहे. याकरिता देशभरातून शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कोल्हापुरात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा भगवा झंझावात कोल्हापुरात निर्माण करण्याची संधी कोल्हापूरच्या शिवसैनिकांना मिळाली आहे. या महाअधिवेशनावर शिवसेनेचे देशातील व राज्यातील भवितव्य अवलंबून असणार असून शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिवसंवाद दौरा आणि राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या अनुषंगाने कोल्हापुरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियोजन व आढावा बैठक राजर्षी शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते.  
 

   बैठकीच्या सुरवातीस बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, शिवसेनेचे महाअधिवेशन पार पाडायची जबाबदारी कोल्हापूरच्या शिवसैनिकांवर दिली आहे. ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कोल्हापुरातील शिवसेनेचे सर्व कार्यक्रम यशस्वी होतात, असा विश्वास मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांना असून, त्यांच्या हा विश्वास महाअधिवेशन आणि सभा यशस्वी करून अधिक दृढ करू. कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातून सुमारे २० हजार शिवसैनिक, कार्यकर्ते सभा स्थळी नेण्याची जबाबदारी स्विकारली असून, ती पूर्ण करून दाखवूया, असे आवाहन केले.
  

 यानंतर बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेनेतील क्रांतीनंतर कोल्हापूरचे निष्ठावंत, कट्टर शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी आणि मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठीशी राहिले. कोल्हापुरातील प्रत्येक कार्यक्रम यशस्वी केला. याची चर्चा राज्यभर झाली. त्यामुळे आगामी कार्यक्रम महत्वाचा असून शिवसेना पक्षाला नवी दिशा देणारा आहे. कोल्हापुरात हे अधिवेशन घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतला हा आपल्यासाठी मानाचा निर्णय आहेच, यासह या निर्णयातून मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचा कोल्हापूरच्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांवर असलेला विश्वास सिद्ध होतो. कोल्हापुरातील या राष्ट्रीय अधिवेशन आणि शिवसंवाद मेळाव्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. कोल्हापुरात होणारा आगामी कार्यक्रम यापूर्वीच्या कार्यक्रमांना तोडीस तोड असा झाला पाहिजे आणि याचा परिणाम राज्याच्या राजकीय क्षेत्रात उमटला पाहिजे. त्यामुळे वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन शिवसेनेच्या सर्वच पदाधिकारी व शिवसैनिकांनी करावे.
 

दि.१५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महाअधिवेशनामध्ये दि.१५ रोजी देशभरातील व राज्यातील शिवसेना नेते, मंत्री, प्रवक्ते, उपनेते, खासदार, आमदार यांच्यापासून तळागाळातील पदाधिकारी यांची नोंदणी केली जाणार आहे. दि.१६ सकाळी व दुपारी आणि दि.१७ रोजी सकाळी अशा तीन सत्रात महाअधिवेशन होणार आहे. यानंतर दि.१७ रोजी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची जाहीर सभा देखील होणार आहे. मा.मुख्यमंत्री महोदयांची गेल्यावर्षी तपोवन मैदानात झालेली सभा रेकॉर्ड ब्रेक करणारी होती त्याचप्रमाणे दि.१७ रोजी होणारी सभा तोडीसतोड अशी असावी. त्यामुळे शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना दिल्या.

मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे तीन दिवस कोल्हापुरात

    शिवसेनेच्या स्थापनेनंतरच्या इतिहासात शिवसेनेचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात होत आहे. याकरिता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपासून तालुकाप्रमुखांपर्यंतचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सर्वांना मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब मार्गदर्शन करणार असून, याकरिता स्वत: मुख्यमंत्री ना.शिंदे साहेब तीन दिवस कोल्हापुरात तळ ठोकणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार असून, संघटनात्मक बांधणी, निवडणूक तयारी याअनुषंगाने होणारी कार्यपद्धती अनुभवता आणि शिकता येणार आहे, असेही श्री.राजेश क्षीरसागर यांनी नमूद केले.

राजकीय बदनामीसाठी माजी पालकमंत्र्यांची रसद : क्षीरसागर यांची टीका

कॉंग्रेस प्रणीत खाजगी सावकारी मोडून अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला यात चुकीचे काय? पण, वैयक्तित स्वार्थासाठी खाजगी सावकार आणि संपत चाललेल्या उबाठाच्या गटाच्या बांडगुळाकडून आपल्या राजकीय बदनामीसाठी षड्यंत्र रचले जात आहे. यास कॉंग्रेसच्या माजी पालकमंत्र्याकडून रसद पुरविली जात आहे. त्यास विरोधी पक्षनेतेही बळी पडले. दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची वाढणारी ताकद पाहून माजी पालकमंत्र्याच्या पायाखालची वाळू सरकली असून, राजकीय बदनामीसाठीच अशी स्टंटबाजी वारंवार केली जात असल्याची टीका श्री.राजेश क्षीरसागर यांनी केला. 

    यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेले माजी नगरसेवक अमोल माने आणि सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासह इतर नूतन पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.

    यावेळी महानगरसमन्वयक शिवाजी जाधव, मा.परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, किशोर घाटगे, अनुसूचित जाती जमाती सेना जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, समन्वयक पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, युवतीसेना शहरप्रमुख नम्रता भोसले, शिवसेना शहर समन्वयक सुनील जाधव शिवसेना जिल्हा व शहर पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना व अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी कामाला लागा : श्री.राजेश क्षीरसागर