बातम्या
महाराष्ट्रात 2024–25 मध्ये ₹8,630.80 कोटींचा CSR निधी खर्च; शिक्षण क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य – डॉ. युवराज येडूरे
By nisha patil - 1/8/2026 7:27:01 PM
Share This News:
महाराष्ट्रात 2024–25 मध्ये ₹8,630.80 कोटींचा CSR निधी खर्च; शिक्षण क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य – डॉ. युवराज येडूरे
कोल्हापूर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात आर्थिक वर्ष 2024–25 मध्ये कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत तब्बल ₹8,630.80 कोटी निधी खर्च करण्यात आला असून 7,223 कंपन्यांनी विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये योगदान दिले आहे. राज्यातील 37 जिल्ह्यांमध्ये हा निधी खर्च करण्यात आला असून मुंबई जिल्ह्याला सर्वाधिक ₹4,436.56 कोटी तर पुणे जिल्ह्याला ₹1,871.18 कोटी CSR निधी प्राप्त झाला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना डॉ. युवराज येडूरे, अध्यक्ष – महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन यांनी सांगितले की, महाराष्ट्रात CSR निधीची मोठी संधी उपलब्ध असून स्वयंसेवी संस्थांनी दर्जेदार, परिणामकारक आणि गरजाधारित प्रकल्प तयार करून कंपन्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
राज्यातील CSR खर्चामध्ये शिक्षण, दिव्यांग कल्याण व उपजीविका या क्षेत्रासाठी सर्वाधिक ₹4,837.55 कोटी खर्च करण्यात आले आहेत. त्यानंतर आरोग्य, भूक व कुपोषण निर्मूलन, सुरक्षित पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या क्षेत्रासाठी ₹2,384.20 कोटी, पर्यावरण संवर्धनासाठी ₹602.11 कोटी, ग्रामीण विकासासाठी ₹295.44 कोटी आणि महिला सक्षमीकरण व सामाजिक समानतेसाठी ₹239.97 कोटी खर्च करण्यात आले आहेत.
डॉ. येडूरे यांनी पुढे सांगितले की, अनेक ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये आजही CSR निधीची मोठी गरज आहे. विशेषतः शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि कौशल्य विकास या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी सक्षम प्रकल्प अहवाल (DPR), पारदर्शक कामकाज आणि कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता केल्यास CSR निधी मिळण्याची शक्यता अधिक वाढते.
तसेच त्यांनी राज्यातील स्वयंसेवी संस्थांना आवाहन केले की, CSR कायदा, कंपनीची CSR धोरणे आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून समाजहिताचे प्रभावी प्रकल्प राबवावेत, जेणेकरून महाराष्ट्रातील ग्रामीण व वंचित घटकांच्या विकासाला अधिक गती मिळेल.
महाराष्ट्रात 2024–25 मध्ये ₹8,630.80 कोटींचा CSR निधी खर्च; शिक्षण क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य – डॉ. युवराज येडूरे
|