ताज्या बातम्या

Kolhapur NDS Squad: कचरा टाकणाऱ्यांवर मनपाची कारवाई; सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड

kolhapur municipal corporation nds squad fine for littering and spitting


By Shivani - 7/16/2026 3:17:42 PM
Share This News:



कोल्हापूरकर सावधान! कचरा टाकलात किंवा थुंकलात तर थेट दंड; मनपाचे NDS स्कॉड मैदानात

कोल्हापूर : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आता कोल्हापूर महानगरपालिकेने आणखी एक कडक पाऊल उचलले आहे. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, प्लास्टिकचा वापर करून कचरा करणे किंवा कुठेही थुंकून अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर आता थेट कारवाई केली जाणार आहे. यासाठी मनपाने 'NDS स्कॉड' (Nuisance Detection Squad - उपद्रव शोधक पथक) स्थापन केले आहे.

शहराची स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मात्र काही जणांच्या निष्काळजीपणामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण होते. यावर आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने हे विशेष पथक तैनात केले आहे.

मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी माहिती देताना सांगितले की, शहराच्या स्वच्छतेला बाधा आणणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. माजी सैनिकांचा समावेश असलेले हे पथक शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी अचानक पाहणी करणार आहे.

रंकाळा तलाव परिसर, श्री महालक्ष्मी मंदिर परिसर तसेच प्रमुख बाजारपेठांमध्ये NDS स्कॉडची नजर असणार आहे. हे पथक २४ तास कार्यरत राहणार असून, नियम मोडणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे.

मनपाकडून प्लास्टिक कचरा आणि उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ११ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूर निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि स्वच्छतेची सवय लावणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Kolhapur Municipal Corporation
Total Views: 14