बातम्या

विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणात वैज्ञानिक तपासाला गती; एफएसएल पथकाची शाळेत सखोल पाहणी

08


By nisha patil - 7/22/2026 7:09:51 PM
Share This News:



विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणात वैज्ञानिक तपासाला गती; एफएसएल पथकाची शाळेत सखोल पाहणी

घटनास्थळावरील भौतिक व डिजिटल पुरावे ताब्यात; तपासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

कुरुंदवाड :कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची प्रगती झाली असून राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (एफएसएल) तज्ज्ञ पथकाने संबंधित हायस्कूलमध्ये जाऊन घटनास्थळाची सखोल तपासणी केली. वैज्ञानिक पद्धतीने पुरावे संकलित करून तपास अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

या प्रकरणाचा निष्पक्ष व सर्वंकष तपास करण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी एफएसएलच्या मदतीने घटनास्थळाची तपशीलवार पाहणी केली. शाळेतील संबंधित वर्गखोल्या, संगणक कक्ष व इतर परिसराचे छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. तसेच सीसीटीव्ही यंत्रणेतील डीव्हीआर ताब्यात घेऊन त्यातील माहितीचे परीक्षण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

यावेळी घटनास्थळावरील सूक्ष्म भौतिक पुरावे, तपासासाठी उपयुक्त वस्तू तसेच संगणक आणि इतर डिजिटल उपकरणांची तांत्रिक तपासणी करण्यात आली. प्रयोगशाळेत पुढील विश्लेषणासाठी आवश्यक नमुने व डिजिटल पुरावेही संकलित करण्यात आले असून प्रत्येक पुराव्याचे शास्त्रोक्त पद्धतीने दस्तऐवजीकरण करण्यात आले.

 

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमधील अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने घटनास्थळीच प्राथमिक न्यायवैद्यक तपासणी करण्यात आली. या वैज्ञानिक तपासाच्या आधारे प्रकरणातील वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होण्यास मदत होईल, असा विश्वास तपास यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे.

 

तारा न्यूज प्रतिनिधी अजित बोडके


विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणात वैज्ञानिक तपासाला गती; एफएसएल पथकाची शाळेत सखोल पाहणी
Total Views: 23