बातम्या

महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलात 11 लाख 49 हजार स्मार्ट टीओडी मीटर

11 lakh 49 thousand smart TOD meters in Mahavitarans Kolhapur circle


By nisha patil - 5/28/2026 11:02:28 AM
Share This News:



महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलात 11 लाख 49 हजार स्मार्ट टीओडी मीटर

 

स्मार्ट मीटर बसवलेल्या उपविभागांत बिलिंग तक्रारी नगन्य

राज्यातील वीज ग्राहकांना अचूक बीलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 7 लाख 8 हजार 664 तर सांगली जिल्ह्यात 4 लाख 41 हजार 134 असे एकूण 11 लाख 49 हजार 798 स्मार्ट टीओडी मीटर कोल्हापूर परिमंडलामध्ये बसविण्यात आले आहेत. उर्वरित वीज ग्राहकांना स्मार्ट टीओडी मीटर बसवून घेण्याचे आवाहन कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांनी केले आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यात 6 लाख 35 हजार 57 लघुदाब ग्राहक, 1 हजार 124 उच्चदाब ग्राहक, 51 हजार 351 लघुदाब नवीन विद्युत जोडणी, 52 उच्चदाब नवीन जोडणी, 1 हजार 204 वीज वाहिनी, 18 हजार 309 वितरण रोहित्र, 774 पुनर्जोडणी, तर 793 वीज निर्मिती प्रकल्प/ केंद्र यांना स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत.

 

सांगली जिल्ह्यात 3 लाख 91 हजार 246 लघुदाब ग्राहक, 699 उच्चदाब ग्राहक, 33 हजार 516 लघुदाब नवीन विद्युत जोडणी, 23 उच्चदाब नवीन जोडणी, 1 हजार 133 वीज वाहिनी, 13 हजार 525 वितरण रोहित्र, 560 पुनर्जोडणी, तर 432 वीज निर्मिती प्रकल्प/ केंद्र यांना स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत. 

 

वीज बिल तक्रारी नगन्य; टीओडीचा लाभ सहा कोटी

कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी, पन्हाळा, कोल्हापूर शहरातील मार्केट यार्ड या तीन उपविभागांत 100 टक्के स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात आले असून येथील वीज बिलाच्या तक्रारी जवळपास नगन्य झाल्या आहेत. तर स्मार्ट टीओडी मीटरमुळे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना चालू आर्थिक वर्षात 85 पैसे इतकी सवलत मिळत आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील स्मार्ट टीओडी मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मासिक बिलातून मागील नऊ महिन्यात 6 कोटी 41 लाखांची टीओडी सवलत दिली आहे.

 

वीज मीटर’ महावितरणचा अधिकार

योग्य मानंकाचे मीटर बसवणे, आवश्यकतेनुसार बदलणे हा अधिकार वीज पुरवठा कंपनी अर्थात महावितरणचा आहे. या वीज पुरवठा करणाऱ्या मीटरची मालकी ही महावितरणची असल्याने हे मीटर बदलताना ग्राहकाच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. केंद्र सरकारचा वीज कायदा 2003, महाराष्ट्र वीज नियामक आयोग विनिमय 2021 - कृती मानके 15.1.1 नुसार महावितरण कंपनीस हे अधिकार मिळाले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या: संकीर्ण -2021/प्र.क्र.215/ऊर्जा 5 दिनांक 25.08.22 नुसार त्याचबरोबर भारत सरकारचे राजपत्र नवी दिल्ली, बुधवार, एप्रिल 1, 2026/ चैत्र 11, 1948 च्या सूचनेनुसार सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ग्राहकांचे जुने मीटर हे कुलुपबंद जागेत/ठिकाणी असतील तर ग्राहकांशी संवाद साधूनच असे मीटर बदलण्यात येत आहेत. 

स्मार्ट मीटर मुळे शंभर टक्के अचूक देयके मिळतात तसेच ग्राहकांना त्यांचा दर तासानुसार होणारा विजेचा वापर महावितरणच्या मोबाईल ॲपवर समजतो, यामुळे अधिक पारदर्शकता निर्माण होत आहे. तसेच सकाळी 9 ते सायंकाळी 5 या सवलतीच्या वीजदराच्या काळात अधिक वीजवापराची उपकरणे वापरण्याचे नियोजन करणे व विजेचा वापर नियंत्रणात ठेवण्याची संधी असे अनेक लाभ असलेले स्मार्ट मीटर महावितरणकडून मोफत बसविण्यात येत आहेत. तरी सर्व वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवण्यास सहकार्य करावे असे आवाहन महावितरण करत आहे.


महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलात 11 लाख 49 हजार स्मार्ट टीओडी मीटर
Total Views: 12