बातम्या
छत्रपती शिवाजी मार्केटमधील थकबाकी असलेले 13 गाळे सील
By nisha patil - 10/9/2026 7:33:44 PM
Share This News:
छत्रपती शिवाजी मार्केटमधील थकबाकी असलेले 13 गाळे सील
महापालिकेच्या इस्टेट विभागाकडून 22 लाखांची वसुली
कोल्हापूर, ता. 10 : कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभाग व उपद्रव शोध पथकाने छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये धडक कारवाई करत महापालिकेचे भाडे थकीत असलेले तब्बल 13 गाळे सील केले. या कारवाईदरम्यान काही गाळेधारकांनी जागेवरच थकीत रकमेचा भरणा केल्याने महापालिकेच्या तिजोरीत 22 लाख 22 हजार 368/- रुपयांची वसुली झाली. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार आज ही कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या शहरातील विविध गाळ्यांच्या भाड्याची थकबाकी मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. सन 2019 ते 2026 या कालावधीतील थकबाकी भरण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी गाळेधारकांना सवलत योजना राबविण्यात आल्या होत्या. तसेच गाळेधारकांना थकीत भाडे भरण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही काही गाळेधारकांकडून थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. या मार्केटमधील एकूण थकबाकी सुमारे 1 कोटी रुपये आहे. कारवाई पूर्वी संबंधित गाळेधारकांना थकीत भाडे भरण्याबाबत कार्यालयामार्फत नोटिसा व सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, थकबाकी न भरल्याने अखेर 13 गाळ्यांवर सीलची कारवाई करण्यात आली. या कारवाईत किराणा, इलेक्ट्रीक, लॉटरी व चप्पल लाईनच्या गाळ्यांचा समावेश आहे. दरम्यान, उर्वरित काही गाळेधारकांनीही आज तातडीने थकीत रकमेपैकी काही रक्कम महापालिकेकडे जमा केली. उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त राम काटकर, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे तसेच इस्टेट विभागातील कर्मचाऱ्यांनी व उपद्रव शोध पथकातील जवानांनी ही कारवाई केली.
महापालिकेच्या गाळ्यांमध्ये भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या सर्व गाळेधारकांनी आपली थकबाकी तात्काळ भरावी अन्यथा थकबाकीदार गाळ्यांवरही सील बंदची कारवाई करण्यात येईल असा इशारा इस्टेट विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी मार्केटमधील थकबाकी असलेले 13 गाळे सील
|