बातम्या
बोलकेवाडी ता आजरा येथे सजले रान भाज्यांचे मेवे*
By nisha patil - 8/19/2026 1:57:39 PM
Share This News:
*बोलकेवाडी ता आजरा येथे सजले रान भाज्यांचे मेवे*
**आजरा(हसन तकीलदार)*तालुका कृषि अधिकारी, आजरा आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बोलकेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर येथे मंगळवार दि.१८/०८/२०२६ रोजी रानभाजी महोत्सव व पाककृती स्पर्धा संपन्न झाल्या. सदर कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य सुधीरभाऊ देसाई होते .
सोबत पं.स. सदस्य समीर पारदे, माजी सभापती निवृत्ती कांबळे,युवराज पोवार, वसंतराव तारळेकर, अमर डोंगरे, सौ. सरिता बोलके, सौ. कल्पना पाटील, सौ. भारती सुतार, सौ. संगीता कोकितकर, पोलीस पाटील संदीप सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. रणरागिणी शेतकरी गट, बोलकेवाडी यांनी विविध रानभाज्यांपासून तयार केलेला पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करणेत आले. आजरा तालुका कृषि अधिकारी, भूषण पाटील यांनी प्रास्ताविक केले. युवराज पोवार यांनी विषमुक्त शेतीचे महत्व अधोरेखित करत गटशेतीच्या माध्यमातून शेती करणेचे आवाहन केले. समीर पारदे यांनी रानभाजी महोत्सव उपक्रमाचे कौतुक केले. सुधीरभाऊ देसाई यांनी गटशेतीच्या माध्यमातून महिलांनी शेती करावी व विविध उद्योग स्थापन करावे असे सुचविले. सदर उद्योगास के. डी. सी.सी. बँक मार्फत कर्ज देण्याची हमी दिली. त्यांनी रणरागिणी शेतकरी गट, बोलकेवाडी यांचे विशेष कौतुक केले.
प्रमुख मार्गदर्शक अनिल चौगुले, निसर्ग मित्र संस्था, कोल्हापूर यांनी रानभाज्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. चौगुले म्हणाले, आपल्या हिंदू संस्कृतीतील सण साजरे करताना त्यात असणारे रानभाज्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. मार्गदर्शन पर भाषण करत असताना त्यांनी विविध रानभाज्यांचे प्रकार, त्यांचे औषधी गुणधर्म याबाबत सविस्तर माहिती दिली.कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 126 रानभाज्या उपलब्ध आहेत. आजच्या बोलकेवाडी येथील रानभाजी महोत्सव कार्यक्रमात कुरुकली या रानभाजीची यात भर पडली असून आता ही संख्या 127 झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक कृषि अधिकारी श्रीम. तृप्ती पाटील यांनी रणरागिणी शेतकरी गटाच्या कार्याबद्दल माहिती दिली.
सदर पाककृती स्पर्धेसाठी वेगवेगळ्या रानभाज्यांपासून पदार्थ तयार करून आजरा तालुक्यातील विविध गावातील ६५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये
१) प्रथम क्रमांक - सौ. मीरा हरेर , हात्तीवडे
२) द्वितीय क्रमांक - सौ. शामल शिंत्रे, मेंढोली
३) तृतीय क्रमांक - सौ. जयश्री डोंगरे, बोलकेवाडी
४) उत्तेजनार्थ क्रमांक - १) सौ. शांता बोलके, बोलकेवाडी २) श्रीम. शालन डोंगरे, बोलकेवाडी क्रमांक पटकावले.
सर्व विजेत्यांना गावातील नागरिक अनिल बोलके, सुरेश बोलके,निवृत्ती शेंडे, पांडुरंग बोलके व मारुती बोलके यांच्याकडून आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमास मंडळ कृषि अधिकारी, आजरा प्रमोद मोने, मंडळ कृषि अधिकारी, उत्तूर मोहन फुले, उप कृषि अधिकारी व्ही. आर. दळवी व सतीश कुंभार, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अमित यमगेकर तसेच कृषि विभागातील सर्व अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. सहाय्यक कृषि अधिकारी सौ. मनिषा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उप कृषि अधिकारी पी.जी.पाटील यांनी आभार मानले. रणरागिणी शेतकरी गटाने कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.
बोलकेवाडी ता आजरा येथे सजले रान भाज्यांचे मेवे*
|