बातम्या
ग्रामीण रुग्णालयात महिला रुग्णासाठी महिला वैद्यकीय कर्मचारी 24 तास उपलब्ध करा-नगरसेवक असिफभाई सोनेखान यांची मागणी**
By nisha patil - 7/23/2026 11:37:25 PM
Share This News:
**ग्रामीण रुग्णालयात महिला रुग्णासाठी महिला वैद्यकीय कर्मचारी 24 तास उपलब्ध करा-नगरसेवक असिफभाई सोनेखान यांची मागणी**
*आजरा (हसन तकीलदार)*:-आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दररोज मोठ्या संख्येने महिला रुग्ण येत असतात परंतु महिला रुग्णांना इंजेक्शन देणे किंवा इतर तातडीचे उपचार करण्यासाठी महिला डॉक्टर, परिचारिका किंवा महिला मदतनीस वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे महिला रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने ग्रामीण रुग्णालय,आजरा येथे महिला डॉक्टर किंवा महिला परिचारिकांची 24 तास नियुक्ती सुनिश्चित करण्यासाठी नगरसेवक आसिफभाई सोनेखान यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. जीवन पाटील यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, आपल्या रुग्णालयातील एका गंभीर समस्येकडे आपले लक्ष वेधून घेऊ इच्छितो.आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दररोज मोठ्या संख्येने महिला रुग्ण येत असतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे की, येथे महिला रुग्णांना इंजेक्शन देणे किंवा इतर तातडीचे उपचार करण्यासाठी महिला डॉक्टर, परिचारिका (सिस्टर) किंवा महिला मदतनीस वेळेवर उपलब्ध नसतात.
अनेकदा महिला रुग्णांना पुरुष कर्मचाऱ्यांकडून इंजेक्शन घ्यावे लागते, ज्यामुळे महिला रुग्णांमध्ये कमालीची गैरसोय, संकोच आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. ग्रामीण भागातील अनेक महिला या कारणास्तव उपचार घेण्यास टाळाटाळ करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. रुग्णांच्या आरोग्यासोबतच त्यांची सुरक्षितता आणि गोपनीयता राखणे हे रुग्णालयाचे कर्तव्य आहे.त्यामुळे आपणास विनंती आहे की, रुग्णालयात 24 तास महिला डॉक्टर किंवा महिला परिचारिकांची नियुक्ती सुनिश्चित करावी. महिला रुग्णांना इंजेक्शन किंवा इतर तपासणीसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था असावी. तात्पुरती सोय म्हणून किमान एका महिला मदतनिसाची (मावशी/अटेंडंट) उपस्थिती अनिवार्य करावी.अशा मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
यावेळी आसिफभाई सोनेखान (नगरसेवक), आसिफ पटेल (नगरसेवक), अमजद माणगावकर (विशेष कार्यकारी अधिकारी), इब्राहिम इंचनाळकर, डॉ. जीवन पाटील, डॉ. सुरजीत पांडव, सोपान बुधवंत, विक्रम गंधाडे, दयानंद उपासे, भूषण इंगवले, प्रदीप पाटील आदिजण उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयात महिला रुग्णासाठी महिला वैद्यकीय कर्मचारी 24 तास उपलब्ध करा-नगरसेवक असिफभाई सोनेखान यांची मागणी**
|