बातम्या

25 हजार चात्यांचा प्रकल्प पूर्ण होत असलेल्या मशनरीचे पूजन-उदघाट्न सोहळा थाटात संपन्न

25thousand


By nisha patil - 11/4/2026 11:56:16 PM
Share This News:



*25 हजार चात्यांचा प्रकल्प पूर्ण होत असलेल्या मशनरीचे पूजन-उदघाट्न सोहळा थाटात संपन्न*

**आजरा (हसन तकीलदार)*:-अण्णाभाऊ आजरा सूतगिरणीच्या 25 हजार चात्यांच्या मशिनरीच्या पूजनाच्या कार्यक्रमासाठी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी व जिल्हा बँकेचे संचालक सुधीरभाऊ देसाई हे राजकीय मतभेद असलेले दोघेजण एकत्र आले आहेत. आजरा तालुक्याच्या विकासासाठी यापुढेही दोघांनी एकत्रच राहावे. सोबतीला आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई यांना घ्यावे असे मत 25 हजार चात्यांच्या प्रकल्प पूर्ण होत असलेल्या मशनरीचे पूजन व उदघाट्न प्रसंगी नाम. हसन मुश्रीफ राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्वच राजकीय नेत्यांनी केलेल्या टोलेबाजीने वातावरणात रंगत आली.

याच वेळी मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेच्या पुढील संचालक मंडळात अशोकअण्णा व सुधीरभाऊ हे दोघेही संचालक असतील असे संकेत दिले. त्यामुळे आगामी काळात आजरा तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता दिसत आहे.

  अण्णाभाऊ आजरा तालुका सूतगिरणी मध्ये 25 हजार चात्यांचा प्रकल्पाच्या मशनरींचे पूजन कार्यक्रम पार पडला.स्वागत व प्रास्ताविक डॉ. अनिल देशपांडे यांनी केले. प्रस्तावीकात ते म्हणाले की, सूत गिरणीची 1979 मध्ये स्थापना करीत आपल्या भागातील लोकांना भागातच रोजगार मिळावा हा काशिनाथ अण्णांचा हेतू होता. कापूस आणि सुताचं गणित कधीच जमत नाही शंभर कोटीच्या वर गुंतवणूक करून अगदी थोडका नफा मिळतो. मुश्रीफ साहेब आणि केडीसी बँकेच्या सहकार्याने हा प्रकल्प इथपर्यंत पोहचला आहे. आजरा सूतगिरणी पश्चिम महाराष्ट्रात एक नंबरला आहे. कोरोना, युक्रेन युद्ध, अमेरिकेचे टेरिफ आणि आता इराणचे युद्ध अशा अडचणीतही सूतगिरणी तग धरून मार्गक्रमण करीत आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक प्रा.अर्जुन आबिटकर, जिल्हा बँकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य सुधीरभाऊ देसाई, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्यासह तालुक्यातील विविध राजकीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वच मान्यवरांनी केलेल्या भाषणात राजकीय टोलेबाजी पहावयास मिळाली. पहिल्यांदा अशोक चराटी यांनी आपल्या भाषणात अर्जुन आबिटकर यांनी केलेल्या सहकार्यामुळेच सुधीर देसाई हे जिल्हा परिषदेला सदस्य झाल्याचे सांगितले. त्यावर बोलताना सुधीर देसाई म्हणाले, अण्णा भाऊंनी जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न आज सर्वांच्या मध्यमातून आणि मुश्रीफ साहेबांच्या मदतीने ते पूर्ण झाले आहे. सूत गिरण्या आणि साखर कारखाने अडचणीत आहेत या सर्व संस्थांना मुश्रीफ साहेब मदत करीत असतात.मला जिल्हा परिषद सदस्य करण्यामध्ये अर्जुन आबिटकर यांचा हातभार तर आहेच त्याचबरोबर जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांचे मोठे योगदान आहे. याबद्दल बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आजरा तालुक्यात शिवसेनेचे उमेदवार उभे करून अर्जुन आबिटकर यांना शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष करायचा होता की तालुक्यात राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्यासाठी हातभार लावायचा होता हे अद्यापही कळले नाही. राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले, गट तट, राजकीय मतभेद विसरून प्रत्येकाची संस्था टिकावी यासाठी धडपडणारा नेता म्हणजे मुश्रीफसाहेब. गोरगरिबांच्या दवाखान्याचा खर्च करून घरापर्यंत सुखरूप पोहचवणारे मुश्रीफसाहेब खऱ्या अर्थाने श्रावण बाळ आहेत.सध्या वस्त्रोद्योगासाठी अडचणीचा काळ आहे. तरीही अबिटकर बंधूंनी भुदरगड तालुक्यात सुतगिरणी उभा करण्याचे धाडस केले आहे. तालुक्यातील अगोदरच असलेली माजी आमदार के. पी. पाटील यांनी सूतगिरणी चांगली चालवली आहे. आता मंत्री आबिटकर उभी करीत असलेली सूतगिरणी चांगली चालते का हे बघायचे आहे. या दोघांची स्पर्धा बघण्याची संधी मिळणार आहे असे सांगितले तर हाच धागा पकडत मंत्री मुश्रीफ म्हणाले, भुदरगड तालुक्यातील आजी-माजी आमदारांमध्ये अशोक स्वामी यांनी इर्षा निर्माण केली आहे. मात्र दोघांच्याही सूतगिरणी व्यवस्थित चालतील. मंत्री मुश्रीफ आपल्या भाषणात म्हणाले, अशोक चराटी आणि मी आता आम्ही दोघे एकत्र आहोत. अनेक विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांच्याशी संघर्ष केला, त्या समरजीत घाटगे, संजय बाबा घाटगे यांना सोबत घेऊन कागलच्या विकासासाठी वाटचाल सुरू आहे. जर आबिटकर बंधूंनी इच्छा व्यक्त केली तर माजी खासदार संजय मंडलिक सुद्धा या एक्सप्रेस मध्ये सहभागी होतील. अशोक चराटी यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मदत केली, त्यामुळे आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी विशेष लक्ष घातलं नाही. नगरपंचायत निवडणुकीच्या वेळीच अशोक चराटी व सुधीर देसाई एकत्र यावेत अशी इच्छा होती. याकरीता मुकुंद देसाई यांनी पुढाकार घेऊन युती करावी अशी सूचना दिली होती. मात्र दुर्दैवाने मुकुंद देसाई आजारी पडल्यामुळे ती युती करता आली नाही. नाहीतर सध्या आजरा तालुक्यातील राजकीय चित्र वेगळे दिसले असते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना? अशोकअण्णा व सुधीरभाऊ एकत्र आले आहेत. तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी आगामी काळात एकत्रच राहावे. मुकुंद दादा यांना सोबतीला घ्यावे. तसेच सुधीर देसाई व अर्जुन आबिटकर यांची मैत्री देखील कायम राहो अशी सदिच्छा व्यक्त केली. त्याचप्रमाणे पुढे ते म्हणाले की, कच्चा माल आमच्या भागात पिकत नाही आणि जेथे कच्चा माल पिकतो तेथे सूतगिरण्या चालत नाहीत. सुताचे दर हे कापसाच्या दरापेक्षा स्वस्त आहेत आणि कापूस महाग आहे. कच्चा माल जर महाग असेल आणि पक्का माल स्वस्तमध्ये विकून संस्था फायद्यात कशी येणार? ही सर्वात मोठी समस्या आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन उत्पादन खर्चात बचत करून संस्था चालवणे गरजेचे आहे. असा सल्ला देत नारळ फोडताना भिंतीवर लिहिलेल्या सुविचाराचाही उल्लेख केला. "निर्णय लेते वक्त हृदय और दिमाग का इस्तमाल करो त्याप्रमाणे अशोकरावानी बरोबर हृदय आणि दिमागचा वापर करून मला बोलवलं असं म्हणताच हस्याचा फवारा उडाला. त्याचबरोबर राजकारण व निवडणूका होतच राहतील पण तब्येतीची काळजी राखून काम करा असा सल्ला अशोक चराटी यांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.यावेळी प्रा. प्रकाश आबिटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. दीपक सातोसकर, विलास नाईक, हाजी हसन शेख, अनिकेत चराटी, माजी नगरध्यक्षाजोत्स्ना चराटी, अन्नपूर्णा चराटी, तसेच सूतगिरणीचे सर्व संचालक,अधिकारी, कर्मचारी आदिजण उपस्थित होते. आभार जनरल मॅनेजर अमोल वाघ यांनी मानले.


25 हजार चात्यांचा प्रकल्प पूर्ण होत असलेल्या मशनरीचे पूजन-उदघाट्न सोहळा थाटात संपन्न
Total Views: 4