बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यात ‘ग्राहक समाधान शिबीरात’ 397 तक्रारींचा निपटारा
By nisha patil - 8/25/2026 9:14:46 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यात ‘ग्राहक समाधान शिबीरात’ 397 तक्रारींचा निपटारा
कोल्हापूर, दि. 25 ऑगस्ट 2026 : वीज ग्राहकांच्या समस्या व तक्रारींचे स्थानिक पातळीवर तातडीने निराकरण व्हावे आणि स्मार्ट मीटरसह विविध वीज विषयक ग्राहकांच्या शंका दूर व्हाव्यात, यासाठी महावितरणच्या कोल्हापूर मंडलात आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक समाधान शिबीरांना चांगला प्रतिसाद मिळाला. 47 ठिकाणी झालेल्या शिबीरात प्राप्त 404 अर्जांपैकी 397 अर्जांचा निपटारा करण्यात आला आहे. केवळ 7 अर्ज प्रलंबित असून, त्यावर कार्यवाही सुरू आहे.
कोल्हापूर मंडलातील विविध विभाग व उपविभागांच्या स्तरावर आयोजित या ग्राहक समाधान शिबीरामध्ये ग्राहकांनी वीजबिल, वीजपुरवठा, मीटर तसेच अन्य वीजविषयक समस्यांबाबत आपल्या तक्रारी व अर्ज सादर केले. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेत त्यावर आवश्यक ती कार्यवाही केली.
कोल्हापूर शहर विभागात 42 पैकी सर्व 42 अर्ज निकाली काढण्यात आले. कोल्हापूर ग्रामीण विभाग 2 मध्ये प्राप्त 96 अर्जांपैकी 96 अर्जांचा निपटारा झाला. कोल्हापूर ग्रामीण विभाग 1 मध्ये प्राप्त 87 पैकी 84 अर्ज निकाली काढण्यात आले. जयसिंगपूर विभागात सर्वच 83 पैकी 83 अर्ज/तक्रारींचे निराकरण करण्यात आले. इचलकरंजी विभागात 56 पैकी 52 अर्ज/तक्रारींचे निराकरण करण्यात आले. तसेच गडहिंग्लज विभागात प्राप्त 40 अर्जांपैकी 40 अर्जांचा निपटारा करण्यात आला.
स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनातील शंका, प्रश्न व गैरसमज दूर करण्यासोबतच ग्राहकांच्या विविध वीजविषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी हे ग्राहक समाधान शिबीर उपयुक्त ठरत आहेत. ग्राहकांनी अशा शिबीरांचा लाभ घेऊन आपल्या समस्या व तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडाव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ‘ग्राहक समाधान शिबीरात’ 397 तक्रारींचा निपटारा
|