बातम्या
इराणी खाणीत पडून राजेंद्रनगरच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
By nisha patil - 7/26/2026 11:13:39 PM
Share This News:
इराणी खाणीत पडून राजेंद्रनगरच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
फायर ब्रिगेडने पाण्यातून बाहेर काढले; सीपीआरमध्ये उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
कोल्हापूर : इराणी खाणीत पडल्याने राजेंद्रनगर येथील एका 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 25 जुलै) रात्री सुमारे नऊच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत तरुणाचे नाव शिवम राजू जाधव (वय 26, रा. आराम चौक, राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवम जाधव हा शनिवारी रात्री इराणी खाण परिसरात गेला असता तो अचानक पाण्याने भरलेल्या खाणीत पडला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला कळविले. फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनंतर शिवमला पाण्यातून बाहेर काढले.
त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला तातडीने उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली असून, नेमका अपघात कसा घडला याचा तपास सुरू आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे राजेंद्रनगर परिसरात शोककळा पसरली आहे.
इराणी खाणीत पडून राजेंद्रनगरच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
|