बातम्या

आखिल भारतीय किसान सभेची आजरा श्रमिक भवनात बैठक संपन्न

542


By nisha patil - 8/30/2026 11:58:58 PM
Share This News:



*देशात सगळ्यात जास्त भरडला जाणारा घटक म्हणजे शेतकरी आणि शेतमजूर-ऍड दशरथ दळवी* 

*आखिल भारतीय किसान सभेची आजरा श्रमिक भवनात बैठक संपन्न*

*आजरा(हसन तकीलदार)**:-कोल्हापूर शहरात दिनांक 6 ते 8ऑक्टोबर 2026रोजी होणाऱ्या अखिल भारतीय किसान सभेच्या 24 व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने आजरा तालुक्याचा आज संघर्ष व लढा मेळावा संपन्न झाला. अखिल भारतीय किसान सभा, आजरा तालुका याने आयोजित केलेल्या या मेळाव्यात शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली

वाढता शेती उत्पादन खर्च, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव, शेतकऱ्यांवरील वाढते कर्ज, हवामान बदल व नैसर्गिक आपत्ती, सिंचन व पाण्याचे प्रश्न, ग्रामीण बेरोजगारी आणि शेती क्षेत्रासमोरील विविध संकटांमुळे शेतकरी-कष्टकऱ्यांसमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली असल्याचे मेळाव्यात स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी श्रमिक भवन आजरा येथे दि. 30 ऑगस्ट 2026रोजी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

 मेळाव्याचे अध्यक्षस्थान कायदेतज्ज्ञ व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ऍड.दशरथ दळवी यांनी भूषविले.

 

अध्यक्षस्थानावरून बोलताना ऍड.दशरथ दळवी यांनी 

 अखिल भारतीय किसान सभेच्या दीर्घ संघर्ष परंपरा सांगत शेतकऱ्यांच्या जमीन, पाणी, पीक व कर्ज प्रश्नांपासून ते शेतीमालाला रास्त व हमीभाव मिळावा यासाठी किसान सभेने सातत्याने लढे उभारले आहेत. शेतकरी कर्जमुक्ती, वीज व सिंचन, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई, ऊस उत्पादकांचे प्रश्न, दूध व इतर शेतीमालाचे भाव, देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न, वनहक्क, जमीन संपादन तसेच शेतमजूर व ग्रामीण कष्टकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर संघटनेने सातत्याने संघर्ष केला असल्याचे मेळाव्यात अधोरेखित करण्यात आले.किसान सभेला शंभर वर्षांचा इतिहास आहे. असेही त्यांनी स्पष्ट करीत स्वातंत्र्यलढ्यातील शेतकऱ्यांचे योगदानही विषद केले.

   तसेच त्यांनी शेवटी शेतकरी व ग्रामीण कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कायदेशीर व संघटनात्मक संघर्ष एकत्रितपणे पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यांनी देवस्थान-मठ ट्रस्ट जमीन प्रश्नातील कायदेशीर बाजू स्पष्ट करताना शेतकऱ्यांनी एकजूट राहून लढा उभा करण्याचे आवाहन केले.

     मेळाव्यात बोलताना अखिल भारतीय किसान सभेचे समन्वयक व जिल्हा सहसचिव संग्राम सावंत म्हणाले,आजरा तालुका व जिल्हा कोल्हापूरमधील देवस्थान तसेच मठ ट्रस्ट जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचे हक्क, इतर शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजूर, कामगार, भूमिहीन, बेघर यांच्या समस्या आणि गावठाणवाढ या प्रश्नांबाबत पुढील लढ्याची ठोस दिशा निश्चित करून लढा देणार तसेच देवस्थान व मठ ट्रस्ट जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क व संरक्षण मिळेपर्यंत निकराचा लढा करणार आहोत.यासाठी अखिल भारतीय किसान सभेला साथ द्या.यासाठी कोल्हापूर शहरात येत्या 6 ते 8 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या अखिल भारतीय किसान सभेच्या 24 व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला आजरा तालुका व परिसरातील शेतकरी-शेतमजूरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहावे असे आवाहन केले.वाटंगीतील शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही. एकाही शेतकऱ्याला भूमिहीन होऊ देणार नाही. वेळ पडल्यास पालकमंत्र्यांच्या दारासमोर बसणार. चळवळीत काम करायचे असेल तर युवकांनी पहिला आपले शिक्षण पूर्ण केले पाहिजे, नोकरी केली पाहिजे आणि लढा दिला पाहिजे असा सल्ला दिला. कोविड काळात भाग घेतलेल्या कोविड योध्यांच्या हक्कासाठी लढा उभा करणार असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते कॉ.संजय घाटगे म्हणाले,संबंधित जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाची मांडणी केली आणि हक्क मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले.राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुका पातळीवरील संघटनात्मक तयारी, शेतकरी प्रश्नांची मांडणी आणि पुढील आंदोलनात्मक कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले.

अखिल भारतीय किसान सभेचे आजरा तालुका नेते कॉ. शिवाजी गुरव यांनी तालुक्यातील शेतकरी-शेतमजूर प्रश्नांची प्रत्यक्ष स्थिती मांडली आणि स्थानिक लढ्यांना संघटित स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली.शेंडापण आमचा आणि हेंडापण आमचा ही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे असे त्यांनी सांगितले . कोणत्याही अमिषाला बळी न पडता चळवळीत निकराने लढा दिला पाहिजे. एकीने लढा दिल्यास यश नक्कीच आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

 कॉम्रेड शांताराम पाटील यांनी शेतमजूर, कामगार व भूमिहीन बांधवांच्या प्रश्नांना शेतकरी चळवळीशी जोडून एकत्रित लढा उभारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले .आताचे सरकार हे आंदोलन चिरडणारे सरकार आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्यासाठी खिळे मारले, चरी खोदल्या. पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त झाले.विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे एक ऊर्जा निर्माण झाली आहे.एका दिवसात आंदोलनाला यश येत नाही. दाभीलच्या रेशन दुकानासाठी 83 दिवस लढा दिला. शेवटी न्यायालयीन लढा दिला लढ्याच्या वज्रमुठीमुळे लढ्याला यश आले. लढा देताना एकी पाहिजे असा सल्ला दिला.

 

मेळाव्यात प्रामुख्याने देवस्थान व मठ ट्रस्ट जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचे हक्क सुरक्षित करावेत, अन्यायकारक बेदखली व शोषणाला आळा घालावा.शेतीमालाला हमीभाव मिळावा.कर्जमुक्ती व पीक विम्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.सिंचन, वीज, पाणी वाटप व नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईचे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत. शेतमजूर, भूमिहीन, बेघर व कामगारांच्या हक्कांसाठी गावठाणवाढ व रोजगार हमी प्रभावी व यशस्वी करण्याचे ठराव करण्यात आले.

            या मेळाव्याला सुरेश शिंगटे,ज्योतीराम राणे,श्रावण चौगुले वंचित युवाचे तालुका अध्यक्ष संतोष मासोळे, भिकाजी कांबळे,दत्तात्रय कांबळे, अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते संभाजी मोहिते, शिवाजी गिलबिले, भगवान सूर्यवंशी, राजेंद्र देशमुख, रामा कांबळे, संतोष माने, शंकर गिलबिले, अमानुल्ला आगलावे,सचिन लोहार, शुभम कांबळे यांच्यासह शेतकरी,शेतमजूर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       अखिल भारतीय किसान सभा

 आजरा तालुका, जिल्हा कोल्हापूर


आखिल भारतीय किसान सभेची आजरा श्रमिक भवनात बैठक संपन्न
Total Views: 126