बातम्या

दर्गागल्ली ते सीडफार्म महागांव रोड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नगरपंचायतीकडे हस्तांतरण करून घ्या -नगरसेविका रेश्मा बुडडेखान*

55


By nisha patil - 7/23/2026 11:43:30 PM
Share This News:



**दर्गागल्ली ते सीडफार्म महागांव रोड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नगरपंचायतीकडे हस्तांतरण करून घ्या -नगरसेविका रेश्मा बुडडेखान*

**आजरा(हसन तकीलदार)*:-पुरोहित बेकर्स पासून दर्गागल्ली, वाणी गल्ली ते सीडफार्म पर्यंतचा नगरपंचायतीच्या हद्दीतील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने रस्त्याची नियमित दुरुस्ती, देखभाल व आवश्यक विकासकामे वेळेवर होत नसल्याने हा रस्ता आजरा नगरपंचायतीकडे हस्तांतरण करून घेणेबाबत नगरसेविका सौ. रेश्मा बुडडेखान यांनी मागणीचे निवेदन मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांना दिले आहे.

    निवेदनात म्हटले आहे की, आजरा नगरपंचायत हद्दीतील मलीक बुरुड यांच्या समोरील पुरोहित बेकरी ते सीडीफार्म या दरम्यानचा आजरा महागाव रस्ता सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. मात्र, या रस्त्याची नियमित दुरुस्ती, देखभाल व आवश्यक विकासकामे वेळेवर होत नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता नगरपंचायत हद्दीत असूनही तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने रस्त्यावरील लहान-मोठी दुरुस्ती, गटारे, मोरी,पावसाच्या पाण्याचा निचरा, पदपथ, स्ट्रीटलाईट, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन, ड्रेनेज, केबल टाकणे तसेच इतर नागरी सुविधा पुरविताना प्रत्येक वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे विकासकामांना अनावश्यक विलंब होतो व नागरिकांच्या अडचणी वाढतात.तसेच, सदर रस्ता नगरपंचायतीकडे हस्तांतरित झाल्यास रस्त्याची नियमित देखभाल, डागडुगी व दुरुस्ती तातडीने करता येईल. दर्गा गल्ली, वाणी गल्ली तसेच परिसरातील नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे देता येतील.

रस्ता विकासासाठी स्थानिक आमदार, जिल्हा नियोजन समिती, राज्य शासन, नगरोत्थान, नागरी सुविधा व इतर योजनांमधून निधी उपलब्ध करून घेणे अधिक सुलभ होईल.

पाणीपुरवठा, गटार, स्ट्रीटलाईट, भूमिगत सुविधा, वेगरोधक, पदपथ इत्यादी कामे स्वतंत्र परवानगीशिवाय नियोजनबद्ध पद्धतीने करता येतील, रस्त्याच्या दुरुस्तीबाबत नागरिकांच्या तक्रारीचे त्वरित निराकरण करता येईल. भविष्यात शहर विकास आराखड्यानुसार या रस्त्याचा विकास करणे सुलभ होईल.

सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायत यांच्यातील प्रशासकीय अडचणी दूर होऊन विकासकामांना गती मिळेल. त्यामुळे मलिक बुरुड यांच्या समोरील राजपुरोहित बेकरी ते सीडफार्म या दरम्यानचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील रस्ता नगरपंचायत,आजरा यांच्याकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ तयार करून संबंधित विभागाकडे पाठवण्याबाबत निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

   यावेळी सौ. रेश्मा बुडडेखान (नगरसेविका ),नौशादभाई बुडडेखान(सामाजिक कार्यकर्ते), युसूफ मुल्ला, निसारभैय्या लाडजी(नगरसेवक), समीरभाई चांद,रशीद शिराज, आप्पा भडगावकर, इरशाद बुडडेखान, बाशीत भडगावकर आदिजण उपस्थित होते.


दर्गागल्ली ते सीडफार्म महागांव रोड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नगरपंचायतीकडे हस्तांतरण करून घ्या -नगरसेविका रेश्मा बुडडेखान*
Total Views: 12