बातम्या
सासने मैदानावरील अद्ययावत बॅडमिंटन हॉलचे काम ८० टक्के पूर्ण
By nisha patil - 7/21/2026 7:35:48 PM
Share This News:
सासने मैदानावरील अद्ययावत बॅडमिंटन हॉलचे काम ८० टक्के पूर्ण
आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केली कामाची पाहणी
कोल्हापूर, दि. २१ : महानगरपालिकेच्या वतीने सासने मैदान येथे उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत बॅडमिंटन हॉलच्या कामाची आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी सोमवारी सायंकाळी पाहणी केली. यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पोवार व कनिष्ठ अभियंता उमेश बागूल उपस्थित होते.
स्टेट लेव्हलच्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी किमान चार कोर्टांची आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून सासने मैदान येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज चार कोर्टांचा बॅडमिंटन हॉल उभारण्यात येत आहे. पूर्वी माजी आमदार कै. दिलीपराव देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये दोन कोर्ट उपलब्ध होती. आता त्यामध्ये आणखी दोन कोर्टांची भर घालून एकूण चार कोर्टांचा अद्ययावत बॅडमिंटन हॉल साकारला जात आहे.
या पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी उर्वरित काम विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कामाची गुणवत्ता कायम राखून परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला दिले.
ई वॉर्ड, रि.स. नं. २१९ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या कामासाठी दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी मे. संगीता कन्स्ट्रक्शन, प्रो. गणेश रमेश खाडे यांची ०.१० टक्के कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली असून या प्रकल्पाची अंदाजपत्रकीय रक्कम सुमारे ४ कोटी रुपये आहे. या कामामध्ये फूटिंग, कॉलम, बीम, आर.सी.सी. स्लॅब, विटांचे बांधकाम, प्लास्टर तसेच हॉलच्या छतावरील पत्र्याचे काम आदींचा समावेश आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.
सासने मैदानावरील अद्ययावत बॅडमिंटन हॉलचे काम ८० टक्के पूर्ण
|