बातम्या

शहाजी महाविद्यालयात  कवी संमेलन व परिसंवाद उत्साही वातावरणात संपन्न. 

A poets gathering and a seminar


By nisha patil - 8/29/2026 11:27:41 PM
Share This News:



शहाजी महाविद्यालयात  कवी संमेलन व परिसंवाद उत्साही वातावरणात संपन्न. 

"भाषेतील सौंदर्यस्थळे शोधा." : डॉ.चंद्रकांत पोतदार

कोल्हापूर : " मराठी भाषा ही स्वयंभू आहे. मराठी भाषेला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक भाषांबरोबर मराठीलाही अभिजात दर्जा मिळाला ही गोष्ट  अभिमानास्पद आहे. भाषा जपणे म्हणजे दैनंदिन जीवनात मराठीचा, मातृभाषेचा उपयोग करणे होय. भाषा सप्ताहाचे शासनाचे धोरण भाषेला जपण्याचेच कार्य करते. शक्य त्या प्रत्येक ठिकाणी मातृभाषेचा वापर करून संवादही मातृभाषेतच करायला हवा. साहित्याच्या भाषेत प्रत्येक वांग्मय प्रकारातून सौंदर्यस्थळे शोधता आली पाहिजेत. संशोधनपूर्वक काम करताना सुद्धा आपल्या भाषेचा दीर्घ अभ्यास व्हायला हवा. बोली भाषेचे सर्व घटक जिवंत ठेवणे ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे." असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी डॉ.चंद्रकांत पोतदार यांनी    केले. 
     

शहाजी महाविद्यालय कोल्हापूर आणि दिनमान साहित्य उत्सव आयोजित उपक्रमात अभिजात भाषा वास्तव आणि दिशा या विषयावरील परिसंवादात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण होते. 
   

राज्य मराठी विकास संस्था महाराष्ट्र, दिनमान कोल्हापूर, शहाजी महाविद्यालय मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालयातील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे सभागृहात कवी संमेलन आणि अभिजात मराठी भाषा : वापर , वारसा, वास्तव आणि दिशा या विषयावरील परिसंवाद  झाला. दिनमान साहित्य उत्सवांतर्गत हा उपक्रम झाला. 
     

संपादक डॉ.विजय चोरमारे, कवी पाटलोबा पाटील, मंदार पाटील, विक्रम राजवर्धन,  रंगराज , विष्णू पावले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी या कवी संमेलनात सहभागी होऊन विविध विषयांवरील कविता सादर करून मार्गदर्शन केले. 
   

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. दीपक कुमार वळवी यांनी स्वागत प्रस्तावित करून या परिसंवादाचा आणि कवी संमेलनाचा हेतू विशद केला. 
   

 प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले . डॉ. विजय चोरमारे यांनी दिनमान अंतर्गतचे विविध उपक्रम, भाषा संवर्धन,भाषा विकास आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेची माहिती दिली. भाषा टिकली तरच राजकारण व संस्कृती टिकेल यावर त्यांनी भर दिला. 
 

 यावेळी वैष्णवी सुतार,समृद्धी गुरव, प्राची मिठारे, प्रांजल, समीक्षा चव्हाण, वेदिका जाधव, प्रा. अमर शेळके, डॉ.विजय देठे, सायली पाटील, डॉ. शोभा चाळके- म्हमाने, डॉ.रचना माने यांनी कविता सादर केल्या.  प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यांनी या कवी संमेलनात उस्फुर्त सहभाग नोंदवला .
 

 शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी विषयातील नामांकित कवितासंग्रहाचे  यावेळी प्रदर्शन संपन्न झाले. मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी या कवितासंग्रह प्रदर्शनास भेट दिली. 
 सूत्रसंचालन प्रा.पि.के.पाटील व डॉ.रचना माने यांनी केले. डॉ.शोभा चाळके म्हमाने यांनी आभार मानले .


शहाजी महाविद्यालयात  कवी संमेलन व परिसंवाद उत्साही वातावरणात संपन्न. 
Total Views: 29