बातम्या

कागल आरटीओजवळील अदानी टोल धोकादायक; शिवसेनेची पाहणी, तातडीच्या कारवाईची मागणी

Adani toll near Kagal RTO is dangerous


By Administrator - 2/28/2026 6:33:53 PM
Share This News:



कागल आरटीओजवळील अदानी टोल धोकादायक; शिवसेनेची पाहणी, तातडीच्या कारवाईची मागणी

कागल (जि. कोल्हापूर) | प्रतिनिधी – अजित बोडके महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील कागल येथील आरटीओजवळील अदानी टोल नाका परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. हा नाका अपघातांचे केंद्र बनत चालल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नाका सुरू झाल्यापासून राष्ट्रीय महामार्गावर नियमबाह्य पद्धतीने अडथळे निर्माण करून धोकादायक वळणे देण्यात आल्यामुळे वाहतूक सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिणामी वारंवार अपघात घडत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सोनगे (ता. कागल) येथील रामदास रंगराव पाटील यांचा, तसेच बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी हेरले (ता. हातकणंगले) येथील शब्बीर हजरत देसाई यांचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

शिवसेना सचिव मा. विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार टोल नाक्याची पाहणी करण्यात आली. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, युवा सेना जिल्हाध्यक्ष मंजित माने, करवीर तालुका प्रमुख विराज पाटील, कागल शहर प्रमुख अजित मोडेकर, वाहतूक सेना प्रमुख म्हाळू करिकट्टे, वैभव मोडेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अपघात टाळण्यासाठी तात्काळ सुरक्षित वाहतूक नियोजन, योग्य दिशादर्शक फलक, प्रकाशव्यवस्था आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.


कागल आरटीओजवळील अदानी टोल धोकादायक; शिवसेनेची पाहणी, तातडीच्या कारवाईची मागणी
Total Views: 51