बातम्या

*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांकडून विसर्जन मिरवणूक मार्गांची पाहणी

Administrative and police officials inspect immersion procession routes ahead of Ganeshotsav


By nisha patil - 8/9/2026 2:23:18 PM
Share This News:



*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांकडून विसर्जन मिरवणूक मार्गांची पाहणी
 

आजरा(हसन तकीलदार):-बाप्पाच्या विसर्जनावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये तसेच वाहतूक व्यावस्था सुरळीत रहावी यासाठी नगरपंचयातीचे अधिकारी,पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, तहसील विभाग अधिकारी तसेच महावीतरणच्या अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत, खड्डे आहेत, विजेच्या तारांची अडचण आहे, झाडांच्या फांद्याची अडचण आहे, गर्दीची जागा अशा ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून त्याबाबत संबंधिताना सूचना दिल्या.
   

आजऱ्यामध्ये प्रामुख्याने परोली गोंड, शिवाजीनगर घाट, वडाचा गोंड, संताजी पूल, गऊळदेव गोंड या ठिकाणी  गणपती विसर्जन केले जातात. या मार्गावर प्रशासकीय व पोलीस अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली व त्याबाबत नियोजन व दुरुस्ती करणेच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे म्हणाले की, विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करणेत आली आहे.

यामध्ये प्रामुख्याने मूर्ती वाहून नेणाऱ्या वाहनाना कोणताही धक्का बसू नये यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, उंच गणेश मूर्तिच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा आणि झाडांच्या फांद्या तातडीने बाजूला करणे, विसर्जन घाटावर पुरेशी विद्युत रोशणाई, जीवरक्षक आणि बॅरेकेडींगची योग्य व्यवस्था करणे, गर्दीच्या ठिकाणी योग्य नियोजन करणे, पार्किंग याबाबत माहिती देण्यात आली असल्याचे सांगितले. विसर्जनावेळी कोणीही अतीउत्साहीपणा करून पाण्यात उड्या मारू नये असेही त्यांनी सांगितले. विसर्जनाबाबत माहिती देताना नाथा देसाई म्हणाले की,शिवाजी नगर तरुण मंडळाचे जवळ जवळ 30 ते 40कार्यकर्ते नदीमध्ये साकव, तरफा बांधून विसर्जनाची जबाबदारी घेतात. तहसील कार्यालयामार्फत लाईफ जॅकेट दिले जातात त्याचप्रमाणे आमचे सर्व कार्यकर्ते पट्टीचे पोहणारे आहेत आणि येथील भागाची परिपूर्ण माहिती असलेले आहेत. गणपतीला कोणतीही इजा होऊ नये याची दक्षता घेत विसर्जन केले जाते. हा उपक्रम जवळ जवळ पंधरा ते विस वर्षापासून राबवला जात आहे.या उपक्रमाला भक्तांनी उदंड प्रतिसाद देऊन पसंती दिली असल्याचे सांगितले.
   

 पोलीस प्रशासन आणि स्थानिक गणेशमंडळांनी आपापसात समन्वय ठेऊन गर्दीचे नियोजन करावे असे आवाहन यावेळी स. पो. नि. सरवदे यांनी केले आहे.यावेळी मुख्याधिकारी सूरज सुर्वे, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, नगरपंचायतीचे आरोग्यअधिकारी अमर कांबळे, वीज वितरणचे सहाय्यक अभियंता कृष्णा कोळी, मुख्य लाईनमन संतोष डोंगरे, पोलीस विभागचे अनंत देसाई तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.


*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांकडून विसर्जन मिरवणूक मार्गांची पाहणी
Total Views: 21