बातम्या

वातानुकुलित आणि पर्यावरणपूरक ई बसेसमुळे कोल्हापूर शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला मिळणार बळकटी, खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन

Air conditioned and eco friendly e buses will strengthen Kolhapur


By nisha patil - 1/8/2026 7:17:16 PM
Share This News:



वातानुकुलित आणि पर्यावरणपूरक ई बसेसमुळे कोल्हापूर शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला मिळणार बळकटी, खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन

केंद्र शासनाकडून कोल्हापूर शहराला मिळालेल्या १०० ई बसेसमुळे के एम टी ची आर्थिक घडी सुधारेल, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्‍वास

पीएम ई बस योजनेतून, केएमटीला शंभर ई बसेस मंजूर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील १० ई बसेस कोल्हापुरात दाखल झाल्यात. तर ऑगस्ट महिन्यात सर्व शंभर ई बसेस कोल्हापुरात येतील. त्यामुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि के एम टी ची आर्थिक घडी सुधारेल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. के एम टी वर्कशॉपला भेट देवून खासदार महाडिक यांनी या नव्या बसेसची पाहणी केली.

प्रवाशांना केएमटीची अधिक चांगली सुविधा मिळावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले आणि १०० ईलेक्ट्रीक बसेस कोल्हापूरसाठी मंजूर झाल्या. त्यापैकी १० ई-बसेस कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी आज  या बसेसची पाहणी केली. यावेळी महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहूल चिकोडे, उपायुक्त परितोष कंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार धनंजय महाडिक यांनी, के एम टी च्या बुध्द गार्डनमध्ये उभारलेले चार्जिंग स्टेशन, डेपो आणि कार्यालयाची पाहणी केली. ई बसेस चालकांसाठी सुसज्ज विश्रांतीगृह असावे, अशी सुचना खासदार महाडिक यांनी केली. तसेच केंद्र शासनाकडून मिळालेल्या निधीतून उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांची माहिती जाणून घेतली. नवीन ई बसेसची पाहणी करून त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांसमवेत नव्या बस मधून फेर फटकाही मारला. सार्वजनिक प्रवासी वाहतुक व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रदुषण मुक्त झाली पाहिजे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रीक बसेसला प्राधान्य दिले. सातत्याने पाठपुरावा केल्याने, कोल्हापूर शहराला पहिल्यांदा १०० ई बसेस मंजुर झाल्या.

शिवाय अन्य पायाभूत सुविधांसाठी शंभर टक्के निधी केंद्र शासनाने दिला. लवकरच १०० ई बसेस के एम टीच्या ताफ्यात दाखल होतील, असे आश्‍वासन महापालिका निवडणूकीपूर्वी दिले होते. त्याची पुर्तता होत असून, कोल्हापुरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. पी एम ई बसेस योजनेतील १०० बसेस मंजुर झाल्यानंतर कॉंग्रेस टिका करत होते. त्यावेळी कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी टिंगल सुध्दा केली.

पण आम्ही हवेत बोलत नाही, तर प्रत्यक्षात करून दाखवतो, हे सिध्द झाले आहे, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांना लगावला. के एम टी प्रशासनाने योग्य वेळापत्रक बनवून, प्रवाशांना वेळेत आणि दर्जेदार सेवा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून, या १०० बस आल्यानंतर के एम टी ची आर्थिक घडी सुधारेल, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. केशवराव भोसले नाट्यगृहाचे खाजगीकरण होणार नाही. त्यामुळे रंगकर्मींनी निश्‍चिंत रहावे. त्यांनी आपल्या सुचना प्रशासनाकडे द्याव्यात, असे आवाहनही खासदार महाडिक यांनी केले. कॉंग्रेसला आता काही काम राहिले नसल्यामुळे, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर नाहक टिका होत आहे, असे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. दरम्यान इंटेलिजेंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमसाठी ८ कोटी रूपयांचा निधी द्यावा. गृह विभागाकडे के एम टी चे प्रलंबित असलेले २ कोटी रूपये मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी परिवहन समिती सदस्य हेमंत आराध्ये यांनी केली.

कार्यक्रमाला नगरसेवक मुरलीधर जाधव, विजयसिंह खाडे-पाटील, प्रा. जयंत पाटील, बबन मोकाशी, चंद्रकांत संकपाळ, प्रमोद देसाई, विजयसिंह देसाई, नगरसेविका दिपा ठाणेकर, रेखा उगवे, माधुरी नकाते, नेहा तेंडुलकर, निलीमा पाटील, अजित ठाणेकर, किरण नकाते, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, पी एन गुरव, प्रसाद जाधव यांच्यासह के एम टी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


वातानुकुलित आणि पर्यावरणपूरक ई बसेसमुळे कोल्हापूर शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला मिळणार बळकटी, खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन
Total Views: 14