बातम्या

आजरा अर्बन बँकेची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अगदी खेळीमेळीत संपन्न

Ajara Urban Banks 66th Annual General Meeting


By nisha patil - 10/9/2026 1:24:07 PM
Share This News:



आजरा अर्बन बँकेची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अगदी खेळीमेळीत संपन्न

*आजरा अर्बन बँक म्हणजे माझी बँक असा विश्वास सगळीकडे रूढ -अध्यक्ष अशोकआण्णा चराटी

*आजरा(हसन तकीलदार):-आजरा अर्बन बँकेची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आण्णा भाऊ सांस्कृतिक हॉलमध्ये अगदी उत्साहात आणि खेळीमेळीत संपन्न झाली. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांनी केले. तर श्रद्धांजली ठराव विनय सबनीस यांनी मांडले.
     

यावेळी संस्थेचे अध्यक्ष चराटी म्हणाले की, आजरा अर्बन बँकेचा एकूण व्यवसाय जवळपास 2 हजार कोटींच्या पुढे गेला आहे. सर्वांना सोबत घेऊन ही घोडदौड सुरु आहे. सर्वांच्या सहकार्यानेच बँकेने गरुडझेप घेतली आहे. बँकेला लवकरच शेड्युल्ड बँक म्हणून दर्जा मिळणार आहे. बँक मोठी करण्यात सर्वच घटकांचे योगदान मोलाचे आहे. आपल्या सर्वांच्या विश्वासाच्या जोरावर बँकेने 1 हजार 500 कोटींच्या ठेवीचा टप्पा पार केला आहे तसेच 1 हजार कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना तसेच प्रधानमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग कर्ज योजना बँक चांगल्याप्रकारे राबवत आहे.

आता बँकेला शेड्युल्ड दर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. लवकरच हा दर्जा बँकेला प्राप्त होईल. आजऱ्यासारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेल्या बँकेने मुंबई, पुणे, कोल्हापूरसह इतर महत्वाच्या शहरात शाखा सुरु केल्या आहेत. त्यांचे कामकाज अगदी उत्तमरित्या सुरु आहे. मल्टिस्टेट असलेल्या आजरा बँकेचा लवकरच गोवा राज्यात विस्तार करण्याचा विचार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
   

सभा नोटीस, विषयपत्रिका वाचन मुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले. सभासदांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांना त्यांनी योग्य व समर्पक उत्तरे दिली. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली. डॉ. संदीप देशपांडे यांना आपले मानवधिकार फाउंडेशन यांचे वतीने स्वातंत्र्य गौरव भूषण पुरस्कार मिळालेबद्दल अध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला तर सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील डॉक्टरेट पदवी मिळालेबद्दल व शिक्षणक्षेत्रातील उल्लेखनीय, समाजपयोगी व प्रेरणादायी योगदानाबद्दल नवभारत -नवमहाराष्ट्र समुहाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा राजश्री शाहू सन्मान सोहळा पुरस्कार मिळालेबद्दल अशोक चराटी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. 75 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर यांनी सूत्रसंचालन केले आणि संचालक इंजि.विजय पाटील यांनी आभार मानले.
   

यावेळी उपाध्यक्ष संजय चव्हाण, डॉ. दीपक सातोस्कर, विलास नाईक, सुरेश डांग, श्रीमती शैला टोपले, रमेश कुरुणकर, अनिकेत चराटी, सिद्धेश नाईक, हृषीकेश सातोस्कर, बसवराज महाळंक, किशोर भुसारी, आनंदा फडके, इंजि. जी. एम. पाटील, मारुती मोरे, दशरथ अमृते, शशिकांत सावंत यांच्यासह आण्णाभाऊ संस्था समूहातील संस्थांचे पदाधिकारी, सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


आजरा अर्बन बँकेची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अगदी खेळीमेळीत संपन्न
Total Views: 102