बातम्या
आजऱ्यात ईद-उल-अजहाँ (बकरईद)उत्साहात व शांततेत साजरी
By nisha patil - 5/28/2026 11:51:24 AM
Share This News:
**आजऱ्यात ईद-उल-अजहाँ (बकरईद)उत्साहात व शांततेत साजरी*
आजरा(हसन तकीलदार)*:-येथील ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधव एकत्र येत ईद-उल-अजहाँ म्हणजेच बकरीद उत्साहात आणि शांततेत पार पडली. यावेळी मौलाना जक्रिया काकतिकर यांनी प्रवचन दिले. नमाज पठण आणि दुआ हाफिज नईम मुराद यांनी केली. यावेळी त्यांनी जे गंभीर आजारी आहेत, अडचणीत आहेत, कर्जदार आहेत त्यांच्या अडचणी दूर होण्यासाठी तसेच विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. तर कुतबा पठण हाफिज अल्ताफ नेसरीकर यांनी केले.
बकरीद सण म्हणजे त्यागाचा, शांतीचा आणि बलिदानाचा संदेश देणारा सण आहे. प्रेषित हजरत इब्राहिम यांच्या काळापासून कुर्बानी केली जाते. ज्यांच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त मालमत्ता असेल तर त्यांनी चांगले, धष्टपुष्ट, निरोगी हलाल जनावर खरेदी करून त्यांनी त्या प्राण्याची कुर्बानी करून त्याचे मांस तीन हिस्यात विभागायचे आणि एक हिस्सा घरात, एक हिस्सा भाऊबंद नातेवाईकात आणि एक हिस्सा गोरगरीबात वितरीत करायचे असते. यामुळे देशाच्या आर्थिक उलाढालीत भरपूर फरक पडतो. गोरगरीब शेतकरी, धनगर समाज, पशु पालक यांना यापासून आर्थिक लाभ होतो. त्यातून त्यांची आर्थिक अडचण दूर होते. चांगल्या किंमतीला त्यांची जनावरे विकली जातात. त्याचप्रमाणे या जनवरांचे मांस गोरगरीबात वितरित करण्याची परंपरा असल्याने याचा लाभ गोरगरीब, गरजू लोकांना होतो. यनिमित्ताने त्यांना चांगले पौष्टिक अन्न मिळते. कुर्बानी नंतर मांसाची प्रक्रिया, वाटप यामुळे ग्रामीण व शहरी भागातील अर्थव्यवस्थेला गती मिळते. मेंढपाळ व शेतकऱ्यांना वर्षभराच्या मेहनतीचा मोबदला या एकाच सणाच्या काळात मिळतो. मुंबईतील केवळ देवनार बाजारात 700 कोटीची उलाढाल होते. देशात अंदाजे 60 ते 70 हजार कोटींची उलाढाल केवळ या सणात होते. त्याचप्रमाणे नवीन कपडे, अत्तर, सुकामेवा,दूध, शेवया या खरेदीतून होणारी आर्थिक उलाढाल वेगळीच. जनावारांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य, चारा आणि खाद्य व्यावसाय देखील तेजीत असतो. थोडक्यात काही दिवसांच्या या सणाच्या काळात जनावरांच्या व्यापारामुळे हजारो कोटी रुपयांची उलाढाल होऊन देशातील कृषी, मांस आणि किरकोळ व्यापार क्षेत्राला मोठी चालना मिळते.
यावेळी ईदगाह मैदानावर अंदाजे पाच ते सहा हजारांचा जमाव होता. ना गोंधळ, ना दंगा, ना चेंगरांचेगरी सर्वजण अनुशासन पाळीत एका रांगेत नमाज पठण करून आपापल्या मृतनातेवाईकांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करून कुर्बानी करण्यासाठी आपापल्या घरी निघुन गेले.
पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले आणि पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या नेतृत्वात चोख व नियोजनबद्ध बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस अनंत देसाई तसेच नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई उपस्थित होते.
आजऱ्यात ईद-उल-अजहाँ (बकरईद)उत्साहात व शांततेत साजरी
|