बातम्या
आजरा शहरातील एच. पी. गॅस धारकांना शहरी नियमानुसार गॅस सिलेंडर मिळाणेची मागणी
By nisha patil - 11/8/2026 9:10:02 PM
Share This News:
**आजरा शहरातील एच. पी. गॅस धारकांना शहरी नियमानुसार गॅस सिलेंडर मिळाणेची मागणी*
**आजरा तहसीलदार समीर माने यांना दिले निवेदन*
**आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा शहरासाठी सौजन्या गॅस एजन्सी गवसे यांचेमार्फत एच. पी. गॅस सिलेंडर पुरवठा केला जात आहे. परंतु ही गॅस एजन्सी गवसे ता. आजरा या ग्रामीण भागात कार्यरत असल्याने आजरा शहरातील ग्राहकांनाही ग्रामीण भागाचे निकष लागू केले आहेत. त्यामुळे आजरा शहरी भागातील ग्राहकांनासुद्धा 45 दिवसानंतर बुकिंग करून त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी गॅस सिलेंडर मिळत असल्याने शहरी भागात असून सुद्धा ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधित गॅस एजन्सी व कंपनीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन आजरा शहरातील एच. पी. गॅस ग्राहकांना शहरी नियमाप्रमाणे नियमित, वेळेत व घरपोच गॅस सिलेंडर उपलब्ध करून देणेसाठी आजरा तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,आजरा शहरातील एच .पी. गॅस ग्राहकांना सौजन्या गॅस एजन्सी, गवसे यांच्यामार्फत एच. पी.गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. सदर गॅस एजन्सी ग्रामीण भागात कार्यरत असल्यामुळे आजरा शहरातील ग्राहकांनाही ग्रामीण भागाचे निकष लागू केले जात असल्याचे दिसून येत आहे.आजरा हे तालुक्याचे मुख्यालय तसेच नगरपंचायत क्षेत्र आहे. मात्र, शहरातील ग्राहकांना ग्रामीण भागाप्रमाणे गॅस बुकिंगसाठी दीर्घ कालावधीची अट लागू होत असल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बुकिंग केल्यानंतरही अनेक ग्राहकांना 10 ते 15 दिवसांनी सिलिंडर मिळतो, तसेच अनेक वेळा ग्राहकांना स्वतः वितरण केंद्रावर जाऊन सिलिंडर आणावा लागतो. घरपोच वितरणाची सेवा वेळेत उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.एका सिलिंडरचा वापर संपल्यानंतर पुढील सिलिंडरसाठी बुकिंग करण्यास 45 दिवसांचा कालावधी आणि त्यानंतर वितरणासाठी पुन्हा, 10 ते 15 दिवसांचा विलंब होत असल्याने प्रत्यक्षात ग्राहकांना 50 ते 60 दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. ही बाब शहरातील ग्राहकांच्या दैनंदिन जीवनाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर व गैरसोयीची आहे. याचा विशेष त्रास ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार व्यक्ती तसेच लहान मुले असलेल्या कुटुंबांना सहन करावा लागत आहे. गॅस सिलिंडर वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे ग्राहकांना पर्यायी इंधनाचा वापर करावा लागतो आणि त्याचा अतिरिक्त आर्थिक भारही सहन करावा लागतो.
आजरा शहरातील ग्राहकांचा पत्ता नगरपंचायत हद्दीत असताना केवळ गॅस एजन्सी ग्रामीण भागात आहे म्हणून त्यांना ग्रामीण ग्राहकांचे निकष लागू करणे योग्य नाही. शहरातील ग्राहकांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार योग्य सुविधा व वेळेत घरपोच सेवा मिळणे आवश्यक आहे.त्यामुळे आजरा नगरपंचायत हद्दीतील सर्व एच.पी. गॅस ग्राहकांना शहरी ग्राहक म्हणून ग्राह्य धरून गॅस बुकिंगचा कालावधी 25 दिवसांचा करण्यात यावा.
सौजन्या गॅस एजन्सी, गवसे यांना आजरा शहरातील ग्राहकांना बुकिंगनंतर दुसऱ्याच दिवशी किंवा शक्य तितक्या लवकर घरपोच गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात याव्यात. बुकिंग केल्यानंतर सिलिंडर वितरणासाठी होणारा 10 ते 15 दिवसांचा अनावश्यक विलंब तातडीने थांबविण्यात यावा.प्रभावी व नियमित घरपोच वितरण व्यवस्था करण्यात यावी.आजरा शहरातील गॅस ग्राहकांना ग्रामीण निकष लागू करण्याबाबतची वस्तुस्थिती तपासून संबंधित गॅस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून शहरातील ग्राहकांना योग्य सुविधा मिळण्यासाठी आवश्यक तो निर्णय घेण्यात यावा.
गॅस वितरण व्यवस्थेवर प्रशासनामार्फत योग्य नियंत्रण ठेवून ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात
यावे. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित गॅस एजन्सी व कंपनीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन आजरा शहरातील सौजन्या गॅस एजन्सीच्या एच.पी. गॅस ग्राहकांना नियमित, वेळेत व घरपोच गॅस सिलिंडर उपलब्ध करून देणेसाठी सूचना व्हाव्यात अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर शरीफभाई खेडेकर (सामाजिक कार्यकर्ते),जावेदभाई पठाण (अन्यायनिवारण समिती सदस्य), अबूसईद माणगावकर, सुशील लतीफ, गौस मुल्ला आदींच्या सह्या आहेत.
आजरा शहरातील एच. पी. गॅस धारकांना शहरी नियमानुसार गॅस सिलेंडर मिळाणेची मागणी
|