बातम्या

जिल्हापरिषद व पंचायतसमिती नूतन पदाधिकारी आणि सदस्यांच्या सत्काराचा देखणा कार्यक्रम संपन्न

Ajra pratinidhi


By nisha patil - 7/4/2026 3:23:13 PM
Share This News:



जिल्हापरिषद व पंचायतसमिती नूतन पदाधिकारी आणि सदस्यांच्या सत्काराचा देखणा कार्यक्रम संपन्न

आजरा(हसन तकीलदार)*:-नुकत्याच पार पडलेल्या जिल्हापरिषद व पंचायतसमिती निवडणुकीत निवडून आलेल्या नूतन सभापती, उपसभापती व सर्व सदस्यांच्या सत्काराचा देखणा कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र)च्या प्रदेश सरचिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बागवे, स्वागत तालुकाध्यक्ष पांडुरंग तोरगले तर प्रस्तावना जिल्हाध्यक्ष इंजिनियर जी. एम. पाटील यांनी केले.

  यावेळी पेरणोली जि. प. सदस्य सुधीरभाऊ देसाई, उत्तूर जि. प. सदस्य शिरीष देसाई, पंचायत समिती सभापती सौ. जयश्री गाडे, पंचायत समिती उपसभापती सौ. यशोदा पोवार व पंचायत समिती सदस्य समिर पारदे, विकास चोथे तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्या सौ. शारदा गुरव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकामध्ये इंजिनियर जी. एम. पाटील म्हणाले की, लोकशाहीचे विकेंद्रिकरण व्हावे या उद्देशाने पंचायतराज व्यवस्था स्वीकारणेत आली. पंचायतराज व्यवस्थेचा पाया म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करणे, समस्या निर्गत करणे ही जबाबदारी वरिष्ठ स्तर म्हणजेच पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असताना गेली चार वर्षे काम ठप्प होते.

परंतु आता नवनिर्वाचित सदस्यांच्यामार्फत ग्रामपंचायतीच्या विकास कामाला अधिक वेग येईल यात काहीच शंका नाही. यावेळी आपल्या अन्य मागण्यांचाही त्यांनी उल्लेख केला.

सभापती जयश्री गाडे यांनी सरपंच परिषदेच्या कामकाजाबाबत येणाऱ्या अडचणीवर नाम. मुश्रीफसाहेब यांच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. उपसभापती यशोदा पोवार यांनी सरपंच पदाबाबतच्या अडचणीसाठी सामूहिक प्रयत्नामध्ये आपणही मदतीसाठी असल्याचे आश्वासन दिले.

 जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादीचे गटनेते सुधीरभाऊ देसाई म्हणाले की, सरपंचांच्या समस्या निवारणासाठी प्रत्येक सोमवारी जिल्हापरिषद कार्यालयात उपस्थित राहून सर्वांना निपक्षपणे सहकार्य करणार असल्याचे बोलले. जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई म्हणाले, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि आता जिल्हा परिषद असा राजकीय प्रवास खूप काही अनुभव देऊन गेला आहे.

या अनुभवाचा वापर नक्कीच तालुक्याच्या विकासासाठी निधी आणून विकास साधण्यासाठी करणार असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात राजू पोतनीस म्हणाले की, आजरा तालुक्यातील सर्वपक्षीय नूतन सदस्यांना एकत्र करून त्यांचा एकाच मंचावर सत्कार समारंभ करण्याचे काम सरपंच परिषदेने केले आहे.

निपक्षपातीपणाची भावना वाढीस लागून तालुक्याच्या विकासाला गती मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी नितीन सावंत यांनी आभार मानले.


जिल्हापरिषद व पंचायतसमिती नूतन पदाधिकारी आणि सदस्यांच्या सत्काराचा देखणा कार्यक्रम संपन्न
Total Views: 115