बातम्या
आजऱ्यात हत्तीपाठोपाठ बिबट्याची दहशत
By nisha patil - 7/13/2026 9:58:27 AM
Share This News:
**आजऱ्यात हत्तीपाठोपाठ बिबट्याची दहशत*
**नागरी वस्तीजवळ बिबट्याचे दर्शन नागरिक भीतीच्या छायेखाली*
**आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा तालुक्याला वन्यप्राण्यांचा त्रास पाचवीला पूजला आहे. मागील महिन्यापासून कासारकांडगाव, सिरसंगी, वाटंगी, धनगरवाडा, घाटकरवाडी या भागात हत्तीने धुमाकूळ घातला होता. आता चांदेवाडी,खेडे, रामतीर्थ परिसर, सुलगांव, साळगाव या भागात बिबट्याने दहशत माजवली आहे.
मागील आठवड्यापासून बिबट्या कुत्र्यांना आपले भक्ष्य बनवत आहे आणि वनविभागाला गुंगारा देण्यात सफल होत आहे. आजऱ्याजवळ असलेल्या रामतीर्थ पर्यटन स्थळाच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ बिबट्याने शनिवारी दर्शन दिल्याने लोकांच्या मनात आता बिबट्याविषयी दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाकडून थर्मल ड्रोन कॅमेऱ्याने शोध सुरु असला तरी वनविभागाच्या सापळ्यात बिबट्या अजून सापडलेला नाही.
शनिवार असल्याने रामतीर्थावरील पिंपळ्या मारुतीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील काही भाविक रामतीर्थकडे जात असताना अंदाजे सायंकाळी 6:00 ते 6:30 च्या दरम्यान प्रवेश द्वाराजवळील शाडूच्या खाणीजवळ झुडपात त्यांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. कुत्र्याला भक्ष बनवून तो आपले भक्ष्य खात झुडपात बसला होता. त्याच्या तोंडाला रक्त लागले असल्याचेही काही प्रत्यक्ष दर्शनींचे म्हणणे आहे. त्यांनी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर बिबट्याने गुरगुरत आणि डरकाळी फोडत त्या ठिकाणाहून आय.टी.आय.च्या दिशेने धूम ठोकली. वनविभागाला याची माहिती मिळताच रामतीर्थ व आय.टी.आय. परिसरात गस्त पथके तयार करून बिबट्याला नागरी वस्तीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गस्त घालत असताना आय. टी. आय. शेजारील जंगलात बॅटरीच्या प्रकाश झोतात बिबटया दिसल्याचे सांगण्यात येत आहे. बिबट्याला माणसांची चाहूल लागताच तो साळगावच्या जंगलात निघून गेला असल्याचे सांगण्यात आले.
मागील आठवड्यात चांदेवाडीच्या योगेश गुंजकर यांच्या नदीकडील शेतात त्यांच्या पाळीव कुत्र्याला बिबट्याने ठार केले होते. त्यानुसार वनविभागाने योगेश गुंजकर यांच्या शेतात पिंजरा लावून त्यात भक्ष्य ठेऊन बिबट्याची वाट पाहिली परंतु बिबट्या तिकडे फरकलाच नाही.
नागरिकांनी रामतीर्थ परिसर, साळगाव तसेच आय.टी.आय.परिसरात रस्त्यावर फिरायला जाताना काळजी घ्यावी. बिबट्याला उसकावण्याचा अथवा त्याच्या समोर जाऊन डिवचण्याचा प्रयत्न करु नका. तसेच बिबट्या दिसताच वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन परीक्षेत्र वनअधिकारी संजय सावंत व वनपाल कृष्णा डेळेकर यांनी केले आहे.
ज्यांचे गोठे आणि जनावरे शेतात आहेत ते भीतीच्या छायेखाली जगत आहेत. खेडे येथील देशपांडे यांच्या शेतात एक कुटुंब शेतीकामासाठी शेतात रहातात. त्यांनी जनावरे व शेळ्या पालन केल्या आहेत. रखवाली साठी कुत्रीही ठेवली आहेत. त्यातील एक कुत्रे बिबट्याने पळवले आहे त्यामुळे शेतीतील कुटुंब भीतीच्या छायेखाली जगत आहे.
आजऱ्यात हत्तीपाठोपाठ बिबट्याची दहशत
|