ताज्या बातम्या

कोल्हापूरला नव्या रिंग रोडची मागणी; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्याची ग्वाही

kolhapur ring road demand shivendraraje bhosale dpr assurance


By Shivani - 11/7/2026 11:29:23 AM
Share This News:



रत्नागिरी-सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्गाची गरज; राज्यमार्ग क्र. १९४ची रखडलेली कामे पूर्ण करण्याचीही मागणी

मुंबई / कोल्हापूर | प्रतिनिधी : 

कोल्हापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि रत्नागिरी व सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी नव्या रिंग रोडची उभारणी करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जाणारी मोठ्या प्रमाणातील वाहने कोल्हापूर शहरातूनच प्रवास करत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येत आहे. रिंग रोड नसल्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होत असून नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर शहराला वळसा घालणारा स्वतंत्र रिंग रोड उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर भागांकडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

यावेळी राज्यमार्ग क्रमांक १९४ वरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याचीही मागणी करण्यात आली.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लवकरच संबंधित विभागाची बैठक आयोजित करण्यात येईल, तसेच नव्या रिंग रोडसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याबाबत आवश्यक निर्देश दिले जातील, अशी ग्वाही दिली.

या आश्वासनामुळे कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Kolhapur Ring Road :
Total Views: 11