बातम्या

आज-यात "आजच्या काळासाठी तुकोबा"या पुस्तकावर चर्चा*

Ajra tukoba


By nisha patil - 12/8/2026 8:53:14 PM
Share This News:



**तुकारामांचा विचार निरक्षर माणसांनी जिवंत ठेवला- डॉ.रणधीर शिंदे*

**आज-यात "आजच्या काळासाठी तुकोबा"या पुस्तकावर चर्चा*

आजरा (हसन तकीलदार)*:-सध्या अनेक महाराजांचा सुळसुळाट होत आहे. वारक-यांचा झेंडाही बदलत आहे.परंतु तुकारामांचा विचार खेड्यातील माणसांनी, निरक्षरांनी जिवंत ठेवला असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. 

           आजरा येथील जनता बँकेच्या सभागृहात राम कृष्ण हरी संस्थेच्या वतीने हभप देवदत्त परूळेकर लिखित आजच्या काळासाठी तुकोबा या पुस्तकावर आयोजित चर्चा सत्रात ते बोलत होते. जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई अध्यक्षस्थानी होते. 

             डॉ शिंदे म्हणाले, ब्रिटिश अभ्यासकांनी तुकारामांच्यावर विवेचन केले. त्यांच्या जागतिक प्रेरणा कथा आहेत. तरूणांना विचार परिवर्तनाला उभं करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांनी मूल्य देण्याची किमया केली आहे. पुस्तकात स्वतःशी बोलण्याचा, मनशांती करण्याचा उल्लेख केला आहे. आधुनिक समाज नकली जाहिरातबाजी, अहंकाराचा आहे. माणूसकी जपण्यासाठी तुकारामाचे अभंग आहेत.ते बळ देणारे आहेत.

             पुस्तकाचे लेखक हभप परूळेकर म्हणाले, जो माणूस भेदाभेद करतो तो वारकरी संप्रदायाच्या विचाराचा नाही. संतांचा विचार आपण सोडत असल्याने प्रश्न निर्माण होत आहेत. व्यवसाय करणाऱ्या व शाळकरी मुलांनी पुस्तक वाचण्याची गरज आहे. तुकाराम हे औषध आहे. तो समजून घेतला तर समाजाचे आरोग्य सदृढ होईल. 

           सुभाष विभुते म्हणाले,गीतेवर बंडखोरी करून प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली.गुलामगिरीच्या काळात तुकाराम महाराजांचा जन्म झाला. तुकारामांनी कोणतेही क्षेत्र सोडले नाही. समाजाच्या मनातील वास्तव तुकारामांनी मांडले.यावेळी प्रा. सुनील शिंत्रे, कवी अजय कांडर यांनीही चर्चेत सहभाग घेतला. 

                यावेळी जि. प सदस्य सुधीर देसाई,कॉ .संपत देसाई, युवराज पोवार, रणजीत देसाई,गौरव सुतार, पांडुरंग जोशीलकर, गंगाराम येडगे, दीपाली गुरव, कल्पना जाधव, मंगल परुळेकर, शांताराम पाटील यांच्यासह इटे, खेडगे, मासोली, पोळगाव, एरंडोळ, सरंबळवाडी, शिरसिंगी, किणे, गाजरगाव, शेळप, मुंगूसवाडी, आवंडी येथील वारकरी उपस्थित होते. युवराज जाधव यांनी प्रास्ताविक केले. कॉ.संजय घाटगे यांनी स्वागत केले तर कॉ.काशिनाथ मोरे यांनी सूत्रसंचलन केले.कॉ.प्रकाश मोरूसकर यांनी आभार मानले.


आज-यात "आजच्या काळासाठी तुकोबा"या पुस्तकावर चर्चा*
Total Views: 20