बातम्या

आजरेकरांना प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागतोय संघर्ष

Ajrekar


By nisha patil - 5/20/2026 6:35:55 PM
Share This News:



**आजरेकरांना प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागतोय संघर्ष*

 आजरा(हसन तकीलदार)*:-पाण्यापासून रस्त्यापर्यंत सर्व गोष्टीसाठी आजरेकरांना संघर्ष करावा लागत आहे. नगरपंचायत झाली सुविधा कमी डोकेदुखी जास्त झाली आहे.पाणी, कचरा, गटर्स, रस्ते, दिवाबत्ती यासारख्या मूलभूत आणि प्राथमिक गरजासाठी लढा द्यावा लागतोय.

    यागोदर पाण्याचे प्रकल्प झाले. शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी गेल्या,वाडवडलांची राहती घरे सोडावी लागली. नुकसान भरपाई आणि जमिनी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. आजसुध्दा धरणग्रस्ताना हेलपाटे मारायची पाळी येत आहे. जमिनी गेल्या गावातील घरे गेली परंतु पाण्याचा लाभ मात्र घेताहेत भलतीच. आजऱ्याला या पाण्याचा किती लाभ मिळत आहे हा संशोधनाचा मुद्दा आहे.

 आता संघर्ष सुरु आहे तो टोलनाक्याचा. टोलनाक्यासाठी जवळपास दोन अडीच वर्षे संघर्ष सुरु आहे. संकेश्वर बांदा महामार्ग म्हणजे सोय कमी आणि दुखणे जास्त होऊन बसले आहे. महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आवंटीत केल्या गेल्या. त्यांच्या मोबदल्याचा प्रश्न, लेंड ओहळवरील पुलाचा प्रश्न, पाण्याचा योग्य प्रकारे निचरा आणि टोल नाक्याचा प्रश्न अशा अनेकविध प्रश्नासाठी आजरेकरांना संघर्ष करावा लागत आहे.

संकेश्वर आणि आजरा पर्यंत प्रवास करणाऱ्यांना टोल नाही परंतु आजरेकरांना मात्र साधं मसोली, देवर्डे,गवसे पर्यंत व्यावसायिक वाहन घेऊन जायचे असेल तर त्यांना टोलचा फटका बसणार आहे. स्थानिक रिक्षाचालक,चारचाकी मालवाहक, टेम्पो, वडाप यासारख्या हाताच्या पोटावरच्या लोकांना टोल भरावं लागणार आणि श्रीमंतांच्या खाजगी चार चाकीला टोल माफ होणार.

 आता परत शक्तिपिठाचा प्रश्न "आ" वासून उभा आहे. शक्तिपीठामुळे आजऱ्यातील हरपवडे, वेळवट्टी, मसोली पासून पोळगांव, खानापूर पर्यंतची 13 गावांची अंदाजे 616 हेक्टर चांगली पिकाऊ जमीन बाधित होणार आहे. हा संपूर्ण पट्टा उसपिकासाठी उपयुक्त आहे. या पट्ट्यातून आजरा साखर कारखान्याला अंदाजे 50 ते 60 हजार मे. टन ऊस उपलब्ध होतो.

सद्या कार्यक्षेत्रात अंदाजे 2 लाख 70 हजार ते 3 लाख मे. टन ऊसाचे उत्पादन होते. पैकी कारखान्याला फक्त 1 लाख 80 हजार ते 2 लाख मे. टन ऊस गाळपास मिळतो. त्यातीलही 50 ते 70 हजार मे. टन ऊस उत्पादन घटले तर 1लाख 10 हजार ते 1 लाख 30 हजार मे. टन ऊस भागातून कारखान्याला मिळणार आहे. त्यामुळे आजरा साखर कारखान्याला कर्जाच्या संकटातून बाहेर काढणे अशक्यप्राय होणार आहे. निसर्ग आणि शेती वाचवण्यासाठी आजरेकरांना गरज नसलेल्या शक्तिपीठ महामार्ग विरोधातही संघर्ष करावा लागत आहे. या शक्तिपिठाचा काडीचाही फायदा आजरेकरांना होणार नाही. परंतु जमिनी मात्र आजरेकरांच्या जाणार आहेत असे शक्तिपीठ संघर्ष समितीचे मत आहे.

आजरेकरांचे दुर्दैव्य म्हणावे लागेल की आजरेकरांना एकही हक्काचा लोकप्रतिनिधी मिळालेला नाही. अशा अनेक प्रश्नासाठी आजरेकर संघर्ष करत आहेत. लोकप्रतिनिधिनी आपली भूमिका स्पष्ट करून आजरेकरांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आजरेकरांचे म्हणणे आहे.


आजरेकरांना प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागतोय संघर्ष
Total Views: 158