बातम्या

जयसिंगपूरात सर्वपक्षीय कॅन्डल मार्च; सोनम वांगचुक प्रकरण व नीट घोटाळ्याच्या निषेधार्थ आंदोलन

All party candle march in Jaysingpur


By nisha patil - 7/20/2026 12:27:30 PM
Share This News:



जयसिंगपूरात सर्वपक्षीय कॅन्डल मार्च; सोनम वांगचुक प्रकरण व नीट घोटाळ्याच्या निषेधार्थ आंदोलन

जयसिंगपूर : प्रतिनिधीसामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा निषेध तसेच नीट (NEET) परीक्षा प्रक्रियेत झालेल्या कथित घोटाळ्याविरोधात जयसिंगपूर शहरात रविवारी सायंकाळी सर्वपक्षीय कॅन्डल मार्च उत्साहात पार पडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी आणि दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव (दादा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मार्चमध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून कॅन्डल मार्चला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत सहभागी नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशा मागण्यांसह शांततापूर्ण पद्धतीने निषेध व्यक्त केला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. "देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विरोधी मतांचा आदर केला पाहिजे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करून सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे. सोनम वांगचुक यांच्यासारख्या देशहितासाठी आवाज उठविणाऱ्या व्यक्तींना दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक आहे," असे ते म्हणाले.

नीट परीक्षा प्रकरणाचा उल्लेख करताना शेट्टी म्हणाले, "लाखो विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षेला सामोरे जातात. मात्र, परीक्षा प्रक्रियेत घोटाळे आणि अनियमितता होत असतील तर विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फिरते. विद्यार्थ्यांचा परीक्षांवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी नीट घोटाळ्याची सर्वोच्च स्तरावर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे."

दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव (दादा) पाटील यांनीही अन्यायाविरोधात समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले. "सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई असो किंवा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित नीट घोटाळा असो, प्रत्येक अन्यायाविरोधात समाजाने एकजुटीने उभे राहिले पाहिजे. हा कॅन्डल मार्च कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून लोकशाही, न्याय आणि देशाच्या भवितव्यासाठी आहे," असे त्यांनी सांगितले.

मार्चदरम्यान नागरिकांनी लोकशाही मूल्यांचे रक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणा दिल्या. केंद्र सरकारने जनभावनांचा आदर करून सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी तसेच नीट परीक्षा प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.या कॅन्डल मार्चमध्ये डॉ. महावीर अक्कोळे, डॉ. चिदानंद आळवेकर, प्रा. राजेंद्र कुंभार, सर्जेराव पवार, चंद्रकांत जाधव, शंकर नाळे, सुदर्शन कदम, अशोक कोळेकर, युनूस डांगे, रंगराव पवार, गुंडाप्पा पवार, रामचंद्र शिंदे, शैलेश चौगुले, स्वाती सासणे, विश्वजीत कांबळे, संजय पाटील (कोथळीकर), आदम मुजावर, आम्रपाली कारंडे, गीतांजली जाधव, राज पवार, पवन सुतार, समीर आत्तार, डॉ. किरण पाटील, डॉ. रियाज अत्तार, सतीश कोळेकर, अभय भिलवडे, रावसाहेब आलासे, नेमीनाथ मादनाईक, सागर माने, अशोक घोरपडे आदी उपस्थित होते.


जयसिंगपूरात सर्वपक्षीय कॅन्डल मार्च; सोनम वांगचुक प्रकरण व नीट घोटाळ्याच्या निषेधार्थ आंदोलन
Total Views: 20