बातम्या
गारगोटीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा; मनसेची आक्रमक भूमिका
By nisha patil - 7/23/2026 3:22:53 PM
Share This News:
गारगोटीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा; मनसेची आक्रमक भूमिका
भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे गुरुवार, दि. २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दिल्ली येथे लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ हुतात्मा स्मारक येथे सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भुदरगड तालुका अध्यक्ष राहुल पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या दडपशाही वृत्तीचा निषेध केला. लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे ही अत्यंत निषेधार्ह बाब असून, अशा हुकूमशाही प्रवृत्तीला लोकशाहीत कोणतेही स्थान नसल्याची टीका त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना उत्तर देण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मोर्चामध्ये मनसेचे भुदरगड तालुका उपाध्यक्ष विश्वजीत पाटील, प्रकाश पाटील, विविध पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची मागणी केली.
गारगोटीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा; मनसेची आक्रमक भूमिका
|