बातम्या
आंबोली सतीचीवाडी येथे चिरेखाणीत साठलेल्या पाण्यात बुडून पर्यटकाचा दुर्दैवी अंत*
By nisha patil - 10/8/2026 11:09:43 PM
Share This News:
**आंबोली सतीचीवाडी येथे चिरेखाणीत साठलेल्या पाण्यात बुडून पर्यटकाचा दुर्दैवी अंत*
**सह्याद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमला मृतदेह काढण्यात यश*
**आजरा(हसन तकीलदार)*:-आंबोली येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा दुर्दैवी अंत होण्याच्या घटना वाढतच आहेत. या आठवड्याच्या तीन चार दिवसात ही तिसरी घटना आहे. त्यामुळे पर्यटकांनीही आपल्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. आनंद लुटताना जीव धोक्यात घालणे कितपत योग्य आहे याचा विचार करायला हवा. आपल्या कुटुंबाचा विचार करायला पाहिजे.
पर्यटनासाठी आलेले पर्यटक आंबोली सतिचीवाडी येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असताना त्यातील चिरेखाणीत साठलेल्या पाण्यात संजय लक्ष्मण गांवकर (वय ५० वर्षे रा. इन्सुली) यांचा बुडून मृत्यु झाला आहे. ही दुर्दैवी घटना सोमवार दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आंबोली सतिचीवाडी चिरखण येथे घडली.
या घटनेची माहिती मिळताच सहयाद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली सांगेलीच्या रेस्क्युअर्सनी धाव घेतली. रेस्क्युअर अजित नार्वेकर यांनी खोल पाण्यात ऊतरून मृतदेह बाहेर काढला. यामध्ये रेस्क्यू टीमचे सदस्य अजित नार्वेकर, राजु राऊळ, उत्तम नार्वेकर, मायकल डिसोजा, सुजित चुलीयन,नारायण चव्हाण, दिपक मेस्त्री, प्रथमेश गावडे, कमलेश गावडे, गिरीश गावडे, विराज गावडे, ओमकार कळसुलकर, विजय राऊत यांनी सहभाग घेतला.
आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे हवालदार लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. माजी सरपंच शशिकांत गावडे यांनी या घटनेची माहिती रेस्क्यू टीमला तसेच पोलीस दूरक्षेत्रला दिली. मिळालेल्या माहितीनुसार मृत संजय यांच्यासह एकूण अकरा जण वर्षा पर्यटनासाठी माजगांव, इन्सुली येथून आंबोली येथे आले होते. माजगांव उद्यमनगर येथील एका कंपनीत सर्वजण कामाला होते. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
आंबोली सतीचीवाडी येथे चिरेखाणीत साठलेल्या पाण्यात बुडून पर्यटकाचा दुर्दैवी अंत*
|