बातम्या
चंदगड येथील दौलत-अथर्व साखर कारखान्याच्या कामगारांचे आमरण उपोषणाला अखिल भारतीय किसान सभेचा जाहीर पाठिंबा
By nisha patil - 9/4/2026 4:04:39 PM
Share This News:
**चंदगड येथील दौलत-अथर्व साखर कारखान्याच्या कामगारांचे आमरण उपोषणाला अखिल भारतीय किसान सभेचा जाहीर पाठिंबा*
या लढ्यात सहभागी होणार- कॉ.संग्राम सावंत*
**आजरा (हसन तकीलदार)*:-थकीत वेतन, रिटेनिंग अलाउन्स आणि अनुचित कामगार पद्धतीविरोधात चंदगड तालुका साखर कामगार युनियन (सीआयटीयू), हलकर्णी येथील कामगार गेल्या ८ दिवसांपासून (२ एप्रिल २०२६ पासून) चंदगड तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहेत. दौलत साखर कारखाना (सध्या अथर्व शुगर्स लि. द्वारे संचालित) यांच्या व्यवस्थापनाने कामगारांचे ३ महिन्यांचे वेतन आणि रिटेन्शन अलाउन्स जाणीवपूर्वक रोखून ठेवले आहे. यामुळे कामगार कुटुंबे उपासमार आणि आर्थिक संकटात सापडली आहेत.
त्यानुसार मुख्य तक्रारी अशा आहेत की,
वेतन प्रदान कायदा १९३६ चे स्पष्ट उल्लंघन करून वेतन वेळेवर न देणे.
एकाच व्यवस्थापनाखालील ‘अथर्व’च्या खाजगी कामगारांना नियमित वेतन देत असताना केवळ ‘दौलत’च्या कामगारांचे वेतन रोखणे – हा स्पष्ट भेदभाव.
कामगार नेत्यांवर सूडबुद्धीने बदल्या करणे (Unfair Labour Practice).
करारासाठी आर्थिक कोंडी करून सक्ती करण्याचा प्रयत्न.
यामुळे कामगारांच्या उपजीविकेच्या हक्काचा (संविधान अनुच्छेद २१) भंग होत आहे.
अखिल भारतीय किसान सभा या अन्यायपूर्ण व बेकायदेशीर कारवाईचा तीव्र निषेध करते. एकाच कारखान्यांतर्गत दोन गटातील कामगारांमध्ये जाणीवपूर्वक भेदभाव करणे हे कामगार चळवळीला आव्हान आहे.त्यामुळे
सर्व थकीत वेतन, रिटेन्शन अलाउन्स व इतर देयके ४८ तासांत पूर्णपणे अदा करावीत.सूडबुद्धीने केलेल्या बदल्या त्वरित रद्द करून कामगार नेत्यांना मूळ जागी पुनर्स्थापित करावे. करार चर्चेसाठी आर्थिक कोंडी व सक्ती थांबवावी. ‘अथर्व’ व ‘दौलत’ कामगारांमध्ये कोणताही भेदभाव न करता समान नियम लागू करावेत.श्रम विभागाकडून तात्काळ चौकशी करून दोषी व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करावी.उपोषणकर्त्या कामगारांवर कोणतीही कारवाई न करण्याचे लेखी आश्वासन द्यावे.
अखिल भारतीय किसान सभा या लढ्यात पूर्णपणे कामगारांसोबत उभी आहे. यासाठी जिल्हाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त (कोल्हापूर), कामगार आयुक्त (मुंबई), साखर आयुक्त (पुणे) आणि केंद्र सरकारच्या श्रम विभागाला निवेदन पाठवले आहे. तसेच उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेले आहे. या सर्वांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी हा लढा चालूच राहील.जर त्वरित कारवाई झाली नाही तर राज्यव्यापी संघर्ष करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.यावेळी कॉ.संग्राम सावंत (समन्वयक -अखिल भारतीय किसान सभा), ॲड.दशरथ दळवी, कॉ. शिवाजी गुरव,संदीप भोगण, भगवान सुर्यवंशी,संभाजी मोहिते, सुप्रिया देवेकर, राणी कांबळे,सुरेखा पाथरवट,रेखा पाटील,गायत्री रणदिवे,संजय कांबळे, समीर खेडेकर, सचिन लोहार,अनिल सुतार,संतोष माने,भारती पवार, लक्ष्मी कांबळे, मजीद मुल्ला, अक्षय कांबळे,जयश्री कांबळे आदिजणांनी भाग घेतला.
चंदगड येथील दौलत-अथर्व साखर कारखान्याच्या कामगारांचे आमरण उपोषणाला अखिल भारतीय किसान सभेचा जाहीर पाठिंबा
|