बातम्या
आजऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती साजरी
By nisha patil - 1/8/2026 7:25:11 PM
Share This News:
आजऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती साजरी
आजरा(हसन तकीलदार):-आजऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 106 वी जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथम उपस्थितांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुराव आयवाळे (जिल्हाध्यक्ष, दक्षिण वंचित बहुजन आघाडी), प्रमुख वक्ते म्हणून कॉ. संग्राम सावंत तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. काशिनाथ मोरे (सामाजिक कार्यकर्ते )व डॉ. उल्हास त्रिरत्ने (प्रभारी महाराष्ट्र राज्य,बहुजन मुक्ती पार्टी)हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना कॉ. संग्राम सावंत म्हणाले की, आण्णाभाऊ साठे यांची जयंती अथवा पुण्यतिथी दिवशी आठवण करून चालणार नाही तर वर्षाच्या बारा महिने यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवली पाहिजे.कॉ.अण्णा भाऊ साठेनी कधीही एका जातीचे काम न करता समग्र जाती पातीसाठी काम केले. शोषित समाजाला वैदिक समाजाने सांस्कृतिक बेड्यामध्ये अडकवले आहे. त्याचबरोबर भांडवलशाहीच्या बेड्यामध्ये हा समाज अडकत असताना हा समाज बेड्यातून निघावा म्हणून आण्णाभाऊंनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जगाला नवी दिशा दिली आहे.
अनेकजण आण्णाभाऊंच्या साहित्याचा अभ्यास करीत आहेत. त्यावर पी.एच. डी. करीत आहेत. आण्णाभाऊंचे साहित्य हे एका खोलीत बसून लिहिलेले साहित्य नाही तर ते जगलेले साहित्य आहे. तळागाळाच्या घटकापर्यंत पोहचून हे साहित्य तयार झालेले आहे. उपवर्गीकरणाची मागणी चुकीच्या पद्धतीने मांडायची सुरु आहे. त्याचे योग्य पद्धतीने अभ्यास करून उपवर्गीकरणाचे काम करणे गरजेचे आहे. उपवर्गीकरणाची क्रांतिकारी चळवळ उभी करणे आजची गरज आहे. ही चळवळ सर्व जाती समाजातील लोकांना घेऊन करणे आवश्यक आहे. शोषितांची चळवळ उभी करण्यासाठी एकजूट बांधावी हेच अण्णाभाऊ जयंतीच्या निमित्ताने सांगू इच्छितो असे कॉ. संग्राम सावंत यांनी यावेळी म्हणाले.
सूत्रसंचालन कॉ.भिकाजी कांबळे (आय. टी. प्रमुख वंचित बहुजन)यांनी केले. यावेळी संतोष मासोळे (तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन ), अजय देशमुख (सेक्युलर मूव्हमेंट ),जीवन शेवाळे (भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष),हिंदुराव कांबळे (लाल निशाण ), रुपाली कांबळे, सरिता कांबळे,नीता शिवणे, राहुल शिपूरकर, राहुल मोरे (बहुजन मुक्ती पार्टी ), काशिनाथ कांबळे, बाळासाहेब कांबळे, दत्तात्रय कांबळे, संदीप कांबळे, मधुकर माने, सुधीर कांबळे आदिजण उपस्थित होते. आण्णाभाऊंच्या जीवनावर खणखणीत पोवाडा गाऊन शाहीर संदीप दाभीलकर यांनी कार्यक्रमाची सांगता करीत आभार मानले.
आजऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती साजरी
|