बातम्या

बी. एस. एन. एल. ची रेंजच गायब - आजऱ्यातील ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर

BSNL s range is gone


By nisha patil - 4/30/2026 11:43:16 AM
Share This News:



बी. एस. एन. एल. ची रेंजच गायब - आजऱ्यातील ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर


आजरा (हसन तकीलदार) - भारत संचार निगम "माणसं जोडणारी माणसं"ही बिरूदावली घेऊन मिरवत आहे. परंतु आजची परिस्थिती पाहिली तर बीएसएनएल ला ग्राहक कंटाळून गेलेले आहेत. सर्वसामान्यांच्या हक्काची बीएसएनएलला घरघर लागल्याचे चित्र सद्या दिसत आहे. आजरा आणि परिसरात मागच्या सोमवारी दिवसभर रेंज गायब होती. आणि आज बुधवारीसुद्धा रेंज गायब असल्याने कित्येक व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे.


खाजगी कंपन्या रिचार्जचे दर वाढवून ग्राहकांची लूट करीत आहेत. आयुष्यभर इन्कमिंग फ्री असणारे कार्ड आता सरकारी कृपेने खाजगीसह बीएसएनएल वाले किमान 150/-₹ चा मासिक रिचार्ज सक्तीचा केला आहे आणि सद्या आधार, बँक खाते, पॅनकार्ड, सरकारी योजना, महिला योजना, शेतकरी योजना, व्यवसाय यासाठी मोबाईल म्हणजे जीवनावश्यक बनले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची रिचार्ज प्लॅनच्या दृष्टीने बीएसएनएल कडे जादा पसंती आहे. परंतु बीएसएनएल च्या वायफाय आणि नेटची पुरता दैना झाली आहे.


बाकीच्या खाजगी कंपन्या 5G पर्यंत मजल मारून पुढच्या तयारीत आहेत. परंतु हक्काची आणि सरकारी कंपनी अजून 4G ची सेवा सुद्धा वेळेत देण्यास असमर्थ आहे. आजऱ्यासारख्या शहरात घरात गेल्यावर रेंज गायब होते तर खेडेगावात काय परिस्थिती असेल याचा विचार न करणेच बरे. सरकारी सेवा म्हणून एकेकाळी विश्वासार्ह असलेली बीएसएनएल आता निष्क्रिय व हलगर्जी व्यवस्थापनामुळे ग्राहक गमावत आहे. उच्चशुल्क आकारूनही समाधानकारक सेवा न देणे म्हणजे ग्राहकांची एक प्रकारची फसवणूकच असल्याची भावना ग्राहकांकडून व्यक्त होताना दिसत आहे. परिणामी अनेक ग्राहकांनी नाईलाजाने खाजगी कंपन्याकडे वळणे पसंत केले असून बीएसएनएल समोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान आ वासून उभे आहे.
 

जग चंद्रावर आणि बीएसएनएल डोंगरावर अशी अवस्था बीएसएनएलची झाली आहे.व्यवसायिक व्यवहार, ऑनलाईन सेवा, शिक्षण, कार्यलयीन कामकाज आणि दैनंदिन कामे पूर्णपणे इंटरनेटवर अवलंबून असताना वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे आणि गायब रेंजमुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. मीडियाचे व्यवस्थापन करताना अनेक अडचणी येत असल्याचे अनेक मीडिया व्यवस्थापकांचे मत आहे. बीएसएनएल वायफाय सेवेबाबत पूर्णतः नाराज आहेत. ग्राहकांची मागणी असूनही आपल्या सेवेत बदल करण्याची मानसिकता अधिकारी वर्गाची दिसून येत नाही. 5G सेवा पूर्ण असूनही ती सुरु करण्यात टाळाटाळ का केली जात आहे याचे गुपित गुलदस्त्यातच आहे. जर आपल्या कामकाजात आणि सेवेत सुधारणा केली नाही तर अधिकारी आणि कर्मचारी आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार यात तिळमात्र शंका नाही. काही कर्मचारी बीएसएनएलची सुविधा सुधारण्यासाठी आग्रही असले तरी अधिकाऱ्यांच्यापुढे त्यांचे काही चालत नसल्याचे दिसून येत आहे.अधिकारी मात्र कोणाच्या दाबवाखाली आहेत याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.


बी. एस. एन. एल. ची रेंजच गायब - आजऱ्यातील ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर
Total Views: 27