राजकीय
राज्य बालविवाह मुक्त करण्यासाठी ‘बालिका पंचायत’ सुरु कराव्यात - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
By nisha patil - 5/14/2026 11:28:54 AM
Share This News:
राज्य बालविवाह मुक्त करण्यासाठी ‘बालिका पंचायत’ सुरु कराव्यात - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. १३ : राज्याला बालविवाहमुक्त करण्याच्या उद्देशाने बालिकांमध्ये जागरूकता, नेतृत्वगुण आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी नांदेड जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात येत असलेल्या ‘बालिका पंचायत’ उपक्रमाच्या धर्तीवर राज्यभर ‘बालिका पंचायत’ सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. तसेच राज्यातील एकल महिलांसाठी प्रभावी आणि सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी विविध राज्यांमधील धोरणांचा अभ्यास करून मसुदा समिती स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजना, बालिका पंचायत उपक्रम, एकल महिला धोरण तसेच बाल संरक्षणाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस महिला व बालविकास आयुक्त माधवी सरदेशमुख, उपसचिव बोंडवे, अवर सचिव प्रसाद कुलकर्णी, उपायुक्त गिरासे दुरदृश्य संवांद प्रणालीद्वारे सहआयुक्त वर्षा पवार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, बालविवाहमुक्त राज्याच्या दिशेने महाराष्ट्राने प्रभावी पावले उचलली असून जनजागृती आणि प्रतिबंधात्मक कारवाईच्या माध्यमातून राज्याने देशात उल्लेखनीय कार्य केले आहे. मागील सात वर्षांत राज्यात तब्बल ६ हजार ३२३ बालविवाह रोखण्यात यश आले असून ही मोहीम अधिक व्यापक आणि लोकसहभागातून राबविण्याची आवश्यकता आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, बालविवाह रोखण्यासाठी केवळ प्रशासनाची कारवाई पुरेशी नसून बालिकांमध्ये जागरूकता आणि नेतृत्व विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे. नांदेड जिल्ह्यातील ‘बालिका पंचायत’ उपक्रमाने यासाठी प्रभावी व्यासपीठ निर्माण केले आहे. या उपक्रमामुळे बालिकांमध्ये आत्मविश्वास वाढत असून सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशीलता निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांत अशाच स्वरूपातील बालिका पंचायत सुरू करून त्यास गती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
राज्य बालविवाह मुक्त करण्यासाठी ‘बालिका पंचायत’ सुरु कराव्यात - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
|