बातम्या
*देवर्डे ता. आजरा येथे पारंपारिक पद्धतीने बेंदूर सण उत्साहात साजरा
By nisha patil - 7/28/2026 3:14:02 PM
Share This News:
*देवर्डे ता. आजरा येथे पारंपारिक पद्धतीने बेंदूर सण उत्साहात साजरा
*आजरा(हसन तकीलदार):-यांत्रिक युगात जनावरांचे महत्व कमी होत असले तरी शेतकऱ्यांचा खरा साथी आहे तो बैल. भारतदेश कृषीप्रधान देश आहे. शेतीबरोबरच इतर व्यवसायिक कामासाठी शेतकरी बैलांचा वापर करतो. आषाढ महिन्यातील तिथीनुसार अत्यंत उत्साहात बैलपोळा अर्थात बेंदूर हा सण शेतकरी त्याच्या लाडक्या सर्जा राजा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. देवर्डे ता. आजरा येथे अगदी थाटामाटात आणि उत्साहापूर्वक बेंदूर पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना या दिवशी कोणत्याही कष्टाच्या कामाला जुपले जात नाही. तर त्यांना पूर्ण विश्रांती दिली जाते. बेंदराच्या दिवशी बैलांची खांदेमळणी अर्थात बैलांचे खांदे गरम पाण्याने शेकून स्वच्छ धुवून त्यांना हळद व तेल लावले जाते बैलांच्या शिंगाना विविध रंगांची रंगरंगोटी करून त्यांना आकर्षक झुली, बाशिंग, माळा आणि घुंगरांची चाळ घालून सजवले आणि वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली जाते. देवर्डे गावात अशाच पारंपारिक पद्धतीने बेंदूर सण साजरा करण्यात आला. गावातील सर्व बैल जोड्या गावाच्या चौकात आणून महिलांनी बैलांची ओवाळणी केली.
घरोघरी पूरणपोळ्या व पारंपारिक पकवान्न बनवून बैलांना पूरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला. पुरणपोळीचा नैवेद्य दिला जात असल्याने याला बैलपोळा ही संबोधले जाते. गावाच्या चौकात बैल जोड्या आणल्यानंतर ज्यांच्या बैलजोड्या होत्या त्यांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. बेंजो आणि वाद्यांच्या गजरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली. यांत्रिक युगात पारंपारिक रूढी आणि पद्धती काळाआड होत असताना देवर्डेकरांनी आजपर्यंत परंपरा जपण्याचे प्रामाणिक कार्य केले आहे त्याबद्दल पंचक्रोशीत देवर्डेकरांचे कौतुक होताना दिसत आहे. यावेळी शामराव तानवडे, सोमनाथ मळेकर, ज्ञानदेव मळेकर, पुंडलिक तानवडे, भरत तानवडे, विष्णू कांबळे, धनाजी पाटील, केदारी गुरव, प्रकाश तानवडे, लक्ष्मण कांबळे, आनंदा बागडी, दिनकर तानवडे यांनी आपल्या बैलजोड्या आणल्या होत्या. तर मिरवणूकीला रवळनाथ तरुण मंडळ, गणेश कला क्रीडा मंडळ, नवयुवक तरुण मंडळ, हनुमान तरुण मंडळ यांचे कार्यकर्ते तसेच दशरथ मळेकर, किशोर पाटील, नितीन पाटील, संजय पाटील, जोतिबा पाटील, राजकुमार तानवडे, रितेश मळेकर, कुणाल बागडी, गुरुनाथ तानवडे, पुंडलिक चाळके यांच्यासह देवर्डे व आसपासचे ग्रामस्थ उपस्थित होते.
*देवर्डे ता. आजरा येथे पारंपारिक पद्धतीने बेंदूर सण उत्साहात साजरा
|