बातम्या
बोलकेवाडीच्या रणरागिनींचे पाणी फाउंडेशनने केले चित्रण*
By nisha patil - 7/27/2026 7:16:32 PM
Share This News:
**बोलकेवाडीच्या रणरागिनींचे पाणी फाउंडेशनने केले चित्रण*
*महिलांनी शेतकरी गटाच्या माध्यमातून १० एक्कर क्षेत्रावर केली सामूहिक शेती*
आजरा(हसन तकीलदार)*: वेळ, श्रम व पैसा वाचविण्यासाठी बोलकेवाडी ( ता. आजरा ) येथील रणरागिणी महिला शेतकरी गटाने इर्जीक पद्धतीने सामूहिक शेती केली आहे. गावातील १० एकर क्षेत्रावर १३ महिला व १ पुरुष यांनी इंद्रायणी भातासह विविध भाताचे चारसूत्री पद्धतीने रोप लागण केली आहे. पाणी फाउंडेशनच्या क्रिएटीव्ह टीमचे प्रमुख क्रिस्तोपर रिगो व विभागीय अधिकारी प्रशांत गवंडी, उपविभागीय अधिकारी अभिषेक सुतार यांनी शेतीमध्ये केलेल्या विविध प्रयोगांचे चित्रण करून महिलांना प्रोत्साहीत केले आहे.
रणरागिनी महिला शेतकरी गटाने एकत्रीतपणे बियाणाची खरेदी, बीज प्रक्रिया, शास्त्रीय पद्धतीने माती परीक्षण करून घेतले. शेतीची मशागत सामूहिक पद्धतीने केली.चारसुत्री पध्दतीने भातरोप लागण करण्यापूर्वी गिरीपुष्पचा पाला टाकून चिखलणी केल्यामुळे नत्र खतात ५० टक्केची बचत झाली. रोपलागणीबरोबर युरिया ब्रिकेटचा १०० टक्के वापर केला आहे. भाताच्या अवशेषाचा पुनर्वापर करून त्याचाही लाभ मिळविला आहे. २५ बाय १५ ची नियंत्रीत पध्दतीने लागवड केली आहे. रोप लागण केलेल्या क्षेत्रात चिकट व कामगंध सापळे लावून अळीचा व किडीचा प्रादुर्भाव रोखला आहे. शेतकरी गट व एसओपीच्या माध्यमातून सामूहिक शेतीची गाणी व ओव्यांच्या माध्यमातून गायिल्यामुळे पडणारा पाऊस व भातरोप लागणीसाठी केलेल्या चिखलात दिवसभर काम केल्यानंतरही महिला उत्साही दिसत होत्या. संघटीत शेती चळवळ व भाताचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रत्येक महिला ध्येयाने प्रेरीत होऊन काम करीत आहे.
एक एकरला भातरोप लागणीसाठी ३० मजूर २५० रुपये मजुरीने घेतल्यानंतर ७,५०० रुपये खर्च येत होता. व ते मजूर वेळेवरही मिळत नव्हते. महिला शेतकरी गट एकत्र येऊन सामूहिकपणे रोपलागण केल्यामुळे हा खर्च शून्य झाला आहे. म्हणजेच मजूर खर्च शून्य झाला आहे.
सामूहिक शेतीबरोबरच महिला शेतकरी गटाने सामाजिक कामही केले आहे. महिला शेतकरी गटाने गावातील मारुती मंदिर परिसरात स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण, प्राथमिक शाळेसमोर परसबाग तयार करून दिली तर आजऱ्यातील अपघातग्रस्त कुटुंबियांच्या शेतातील भातरोप लागण करून देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
यावेळी बोलताना तृप्ती पाटील सहाय्यक कृषी अधिकारी, आजरा म्हणाल्या की,संघटित महिला शक्तीचा समूहशेतीमध्ये योग्य वापर करुन पिकांचे उत्पादन वाढावे. प्रत्येक महिला ध्येयाने प्रेरीत होऊन काम करत असल्यामुळे सामूहिक शेतीच्या माध्यमातून आदर्श काम करण्याचा प्रयत्न केला आहे.
बोलकेवाडीच्या रणरागिनींचे पाणी फाउंडेशनने केले चित्रण*
|