बातम्या

मनपाच्या उद्यानातच ‘गांजाची शेती’! नागपुरातील धक्कादायक प्रकाराने प्रशासन हादरले

Cannabis cultivation right inside


By nisha patil - 7/20/2026 12:02:10 PM
Share This News:



मनपाच्या उद्यानातच ‘गांजाची शेती’! नागपुरातील धक्कादायक प्रकाराने प्रशासन हादरले

अजनी परिसरातील उद्यानात गांजाची झाडे आढळल्याचा दावा; भाजप नेते मुन्ना यादव यांच्या व्हिडिओने उडाली खळबळ
 

नागपूर | प्रतिनिधी : नागपूर महानगरपालिकेच्या उद्यानातच गांजाची झाडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अजनी परिसरातील मनपाच्या उद्यानात अज्ञात व्यक्तींनी गांजाची लागवड केल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणाचा व्हिडिओ भाजप नेते मुन्ना यादव यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मनपा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
 

स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही या उद्यानात काही तरुण गांजा सेवन करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे केल्या होत्या. सुरुवातीच्या तपासात ठोस पुरावे मिळाले नव्हते. मात्र, त्यानंतर अधिक चौकशीदरम्यान उद्यानात संशयास्पद झाडे आढळून आली. ही झाडे गांजाची असल्याचा दावा व्हिडिओद्वारे करण्यात आला आहे.
 

या घटनेमुळे सार्वजनिक उद्यानांच्या सुरक्षेवर आणि देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील मनपाच्या उद्यानातच अशी लागवड कशी झाली, याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
 

दरम्यान, संबंधित झाडांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, ती गांजाचीच झाडे आहेत का, याची खातरजमा करण्यात येणार आहे. तसेच ही लागवड कोणी आणि कोणत्या उद्देशाने केली, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि मनपा प्रशासनाने संयुक्त तपास सुरू केला आहे. तपासानंतरच या प्रकरणातील नेमके सत्य स्पष्ट होणार आहे.


मनपाच्या उद्यानातच ‘गांजाची शेती’! नागपुरातील धक्कादायक प्रकाराने प्रशासन हादरले
Total Views: 15