बातम्या
महावितरणच्या पथकाला धक्काबुक्की करणार्या विरोधात गुन्हा नोंद
By nisha patil - 9/9/2026 10:44:49 PM
Share This News:
महावितरणच्या पथकाला धक्काबुक्की करणार्या विरोधात गुन्हा नोंद
समाज माध्यमावर चुकीचा व्हिडीओ प्रसारित करणार्या व्यक्तीवरही गुन्हा नोंद
सांगली, दि. ८ सप्टेंबर २०२६ : वीजबिलाची थकबाकी वसुली व स्मार्ट मीटर बसविण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला विरोध करत मालन अरूण कारंडे, किशन अरूण कारंडे यांनी धक्काबुक्की केल्याची घटना कुपवाड परिसरात घडली. तसेच या घटनेचा एकांगी व दिशाभूल करणारा व्हिडीओ चंदनदादा चव्हाण यांनी समाज माध्यमातून प्रसारित केला. याप्रकरणी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता प्रियांका पापा बिरणगे यांच्या तक्रारीनुसार यांच्या विरुध्द कुपवाड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय सहिंता अंतर्गत कलम 132, 121 (1), 221, 352, 351 (2), 356 (2) व 79 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, महावितरण पथक हे श्री. स्वामी समर्थ मंदिराजवळ रामकृष्णनगर, कुपवाड परिसरात वीज ग्राहक मनिषा संतोष कारंडे यांची वीजबील थकबाकी वसुली तसेच जुना मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू होते. मनिषा संतोष कारंडे या वीज ग्राहकाचे जूने मीटर बदलून सर्व पथक पुढे जात असताना मनिषा कारंडे यांच्या घराशेजारी राहणारे किशन अरुण कारंडे व मालन अरुण कारंडे पथका समोर आले. त्यांनी महावितरण पथकाशी हुज्जत घालून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या घटनेशी संबंधित व्हिडिओ काटछाट करून चंदनदादा चव्हाण यांच्या फेसबूक या सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. व्हिडिओमध्ये घटनेची एकतर्फी माहिती देऊन महावितरण कंपनीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या घटनेनंतर कनिष्ठ अभियंता प्रियांका पापा बिरनगे यांनी वरिष्ठांना माहिती देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत कुपवाड पोलिस ठाण्यात संबंधिताविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
स्मार्ट मीटरबाबत गैरसमज पसरवू नयेत – अमित बोकील
स्मार्ट मीटर हे ग्राहकाच्या फायद्याचे आहेत. शासनाच्या आदेशानुसार स्मार्ट मीटर बसवण्यात येत असून ग्राहकांनी याकामी अडथळा निर्माण करू नये. तसेच समाज माध्यमातून चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करू नये, अन्यथा अशा व्यक्तींवर महावितरण कायदेशीर कारवाई करेल. ग्राहकांनी महावितरणशी संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन सांगली मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अमित बोकील यांनी केले आहे.
महावितरणच्या पथकाला धक्काबुक्की करणार्या विरोधात गुन्हा नोंद
|