बातम्या
लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठीचे साखळी उपोषण तात्पुरते स्थगित; ११ ऑगस्टला मंत्रालयात बैठकीचे आश्वासन
By nisha patil - 10/8/2026 12:55:07 PM
Share This News:
लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठीचे साखळी उपोषण तात्पुरते स्थगित; ११ ऑगस्टला मंत्रालयात बैठकीचे आश्वासन
कोल्हापूर : प्रतिनिधी आचिन हेरवाडे लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले बेमुदत साखळी उपोषण आज मुख्यमंत्री यांच्या वतीने आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले.
लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांचा लाभ मिळावा, तसेच जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लिंगायत समाजाला आर्थिक विकासाच्या योजनांचा लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते.
दरम्यान, आंदोलनस्थळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्या वतीने मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी मंत्रालयात संबंधित मागण्यांवर बैठक आयोजित करून सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणारे इचलकरंजी महानगरपालिका नगरसेवक संजय तेलनाडे यांनी साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे जाहीर केले.
या आंदोलनाला लिंगायत समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लाखोंच्या संख्येने समाजबांधव आंदोलनस्थळी उपस्थित राहून आपल्या मागण्यांसाठी एकजूट दाखवली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लिंगायत समाजाच्या एकजुटीचे आणि शक्तिप्रदर्शनाचे चित्र पाहायला मिळाले.
“आश्वासन मिळाले आहे; आता ११ ऑगस्टच्या मंत्रालयातील बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शासनाने दिलेल्या शब्दाची पूर्तता करून लिंगायत समाजाच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा,” अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
आंदोलनामुळे शासनाचे लक्ष लिंगायत समाजाच्या मागण्यांकडे वेधले गेले असून, मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशाराही समाजाच्या वतीने देण्यात आला.
लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठीचे साखळी उपोषण तात्पुरते स्थगित; ११ ऑगस्टला मंत्रालयात बैठकीचे आश्वासन
|