बातम्या

ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पुलाची स्वच्छता; शिवशंभू दुर्गप्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

Cleaning of the historic Chhatrapati Shivaji Maharaj Bridge


By nisha patil - 8/16/2026 11:46:22 PM
Share This News:



ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पुलाची स्वच्छता; शिवशंभू दुर्गप्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
 

कोल्हापूर, प्रतिनिधी : कोल्हापूर आणि कोकणाला जोडणाऱ्या ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी महाराज पुलावर रविवारी (दि. १६ ऑगस्ट) सकाळी सात वाजल्यापासून शिवशंभू दुर्गप्रतिष्ठान, कोल्हापूर यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ऐतिहासिक वास्तूंचे जतन, स्वच्छता आणि संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
 

सन १८७८ मध्ये ब्रिटिश काळात बांधण्यात आलेला हा पूल कोल्हापूरला कोकणाशी जोडणारा महत्त्वाचा ऐतिहासिक दुवा आहे. मजबूत बांधकाम आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीमुळे या पुलाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शंभरहून अधिक वर्षे वाहतुकीसह अनेक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असलेला हा पूल आज मात्र देखभालीअभावी दुरवस्थेला सामोरा जात आहे.
 

पुलाच्या दोन्ही बाजूंना निर्माण झालेले अडथळे, अनधिकृत पार्किंग, माती-मुरूम टाकून मार्गात निर्माण झालेली अडचण तसेच रात्रीच्या वेळी पुलावर होणारे मद्यप्राशन आणि त्यानंतर पडणारा कचरा यामुळे या ऐतिहासिक वास्तूच्या स्वच्छतेबरोबरच प्रतिष्ठेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
 

या पार्श्वभूमीवर शिवशंभू दुर्गप्रतिष्ठानने प्रशासनाची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेत पुलाची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. मोहिमेदरम्यान पुलावरील तसेच परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि इतर अनावश्यक वस्तू गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी नागरिकांमध्ये ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
 

‘ऐतिहासिक वास्तू केवळ शासनाची नव्हे, तर समाजाचीही जबाबदारी आहे’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. स्वच्छ परिसर, निरोगी समाज आणि पर्यावरण संवर्धनाबरोबरच कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचा उद्देश या मोहिमेमागे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या स्वच्छता मोहिमेत शिवशंभू दुर्गप्रतिष्ठानचे अध्यक्ष ओमकार पाटील, उपाध्यक्ष जीत सावत, लखन सुतार, आभय गायकवाड, सतीश आरकर, अमर पोवार तसेच हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले.

 

ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पुलाची स्वच्छता राखण्याबरोबरच त्याची दुरुस्ती, देखभाल आणि परिसरातील अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनानेही तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.


ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पुलाची स्वच्छता; शिवशंभू दुर्गप्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
Total Views: 5