बातम्या
*हजगोळी खुर्द ता. आजरा येथील ग्रामसेवक विरोधात ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची तक्रार
By nisha patil - 8/18/2026 8:17:51 PM
Share This News:
*हजगोळी खुर्द ता. आजरा येथील ग्रामसेवक विरोधात ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची तक्रार
*ग्रामसेवक यांची चौकशी होऊन योग्य कारवायीच्या मागणीचे दिले निवेदन
*आजरा(हसन तकीलदार):-हजगोळी खुर्द गावचे ग्रामसेवक यांच्यावर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अनेक गंभीर आरोप करीत त्यांची चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी तसेच दोषी आढळलेस त्यांचे निलंबन व्हावे असे निवेदन गटविकास अधिकारी, आजरा तहसीलदार, तिन्ही लोकप्रतिनिधी तसेच इतर कार्यालयाना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हजगोळी खुर्द गावचे ग्रामसेवक एस.के. येळणे यांचा कारभार सदस्यांना विश्वासात न घेता चाललेला असतो. सदस्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारल्यास ते उद्धट उत्तरे देतात. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये आवश्यक असलेला परस्पर आदर समन्वय व सौदार्यपूर्ण वातावरण राखणेस आडथळा निर्माण होत आहे.
तसेच ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या नोटीस सदस्यांपर्यंत पोहचत नाहीत व मासिक मिटींग वेळेवर लावत नाहीत. तसेच ग्रामसभेच्या नोटीस देखील काढत नसून त्या लोकांपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे ग्रामसभा झालेल्या लोकांना कळत नाहीत. या मिटींगासुध्दा कागदावरच दाखवून सदस्यांच्या सह्या देखील बोगस मारतात याची चौकशी व्हावी. आपणास हे चुकीचे वाटत असल्यास सह्या हस्ताक्षर नमुना तपासणीस पाठवावेत.
१५ वा वित्त आयोग सुरु झालेपासून गावाला किती बजेट मंजूर झाले, कोणत्या कामावर किती खर्च झाला याची गाव मिटींगमध्ये ग्रामस्थाना माहिती देणे बंधनकारक असताना ते माहिती देत नाहीत. उलट मी स्वतः साडेसात लाख रुपये खर्च करुन गावाला मंत्रालयातून कामे मंजूर करून आणलेली आहेत अशी उत्तरे देतात. याचे व्हीडीओ देखील उपलब्ध आहेत. तर यांनी ७,५०,०००/ ₹ कोणाला दिले याची चौकशी व्हावी तसेच देणारा व घेणारा दोषी ठरत असल्याने त्यांचेवर कारवाई व्हावी.
तसेच मी तुमच्या गावची प्राथमिक शाळा वाचविणेसाठी वाढीव पटसंख्या दिसावी म्हणून तुमच्या गावचे रहिवासी नसलेल्यांनाही रहिवासी दाखले दिले आहेत असे ते सांगतात. भारतात जन्मलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही सरकारी शाळेत शिकण्याचा संविधानीक अधिकार असताना यासाठी रहिवासी दाखल्याची गरज नसताना यांनी चुकीचे खोटे दाखले दिले असतील तर याची चौकशी व्हावी व त्यांचेवर कारवाई व्हावी व यांचे पंचायत समितीमध्ये आजपर्यंतच्या कार्यकाळातील चुकीचे रहिवासी दाखले असतील तर रद्द व्हावेत.आपण सरकारी अधिकारी आहोत, आपण आपले काम प्रामाणिकपणे व जबाबदारीने करावे याचे भानच नसल्यामुळे एस.आय.आर.नोंदणी घरी जाऊन करणे बंधनकारक असताना देखील त्यांनी तशी नोंदणी केलेली नाही. तुम्ही घरी जाऊन एस.आय.आर. का केला नाही?असे विचारले असता, त्याचा काय संबंध असे त्यांचे उत्तर आहे. याचे व्हीडीओ देखील आमचेकडे उपलब्ध आहेत. प्रत्येकाचे घरी जाऊन आणि भेट न झालेस तीन भेटी देऊन चौकशी करुन तीसऱ्या भेटीवेळी भेट न झालेस दारावर नोटीस लाऊन येणे असे शासन आदेश असताना त्यांची घरी न जाताच एस.आय.आर. नोंदण्या केलेल्या आहेत. तेंव्हा आमच्या गावातून काही नावे वगळली गेली असल्यास येणाऱ्या नवीन यादीत असे काही आढळून आल्यास कर्तव्यात कसुर केल्याबद्दल त्यांचेवर कारवाई व्हावी.
अशा या बेजबाबदार अधिकाऱ्याची पूर्ण चौकशी व्हावी व चौकशी पुर्वी बदली करून दप्तर तपासणी व्हावी अन्यथा हे फेरफार करणेची शक्यता आहे. आजच यांचे सर्व दप्तर ताब्यात घ्यावे. आपण त्यांचेवर कारवाई न केलेस आम्हा ग्रामस्थाना लोकशाही मार्गाने मोर्चा, उपोषण इत्यादी मार्ग अवलंबावे लागतील.असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर प्रशांत कोटकर (उपसरपंच ), मनीषा कांबळे (सदस्या), सरिता केसरकर(सदस्या), लता जाधव(सदस्या), डॉ. रोहन जाधव यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
*हजगोळी खुर्द ता. आजरा येथील ग्रामसेवक विरोधात ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची तक्रार
|