बातम्या

*उत्तूरच्या बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम पूर्णत्वासाठी कॉ. शिवाजी गुरव यांचे बेमुदत हलगीनाद व धरणे आंदोलन सुरु

Comrade Shivaji Gurav has launched an indefinite Halginaad


By nisha patil - 8/18/2026 8:16:43 PM
Share This News:



*उत्तूरच्या बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम पूर्णत्वासाठी कॉ. शिवाजी गुरव यांचे बेमुदत हलगीनाद व धरणे आंदोलन सुरु

*आजरा(हसन तकीलदार):-कोल्हापूर जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष कॉ. शिवाजी गुरव यांनी दि. 3/8/2026 रोजी आजरा आगार व्यवस्थापकांना उत्तूरच्या बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम तात्काळ सुरु करून पूर्णत्वास नेण्यासाठी निवेदन दिले होते. जर बांधकाम सुरु झाले नाही तर दि. 18/8/2026 रोजी पासून उत्तूर येथे बेमुदत धरणे व हलगीनाद आंदोलन सुरु करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार कॉ. शिवाजी गुरव यांनी आपल्या साथीदारासह बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
       

यावेळी बोलताना कॉ. शिवाजी गुरव म्हणाले की,आजरा तालुक्यातील उत्तूर व परिसरातील जवळपास 40 गावांना मध्यवर्ती ठिकाण असलेल्या उत्तूर बसस्थानकाचे बांधकाम मागील एक दीड वर्षापासून बंद आहे. सदर बांधकामाचे स्टील(सळ्या)आहे त्या परिस्थितीत राहिल्यास व नंतर बांधकाम सुरु केल्यास धोकादायक इमारत होण्याची शक्यता आहे. लोखंडी सळ्या पावसाने गंजून नुकसान होत आहे.त्यामुळे कायदा व माणुसकीचा व्यवहार यांची सांगड घालून काम सुरु करणे गरजेचे आहे. सदर बसस्टॅन्ड हे जवळ जवळ 60 ते  70 वर्षापूर्वीचे जुने एस टी स्टॅन्ड आहे. असे असताना सायलेंट झोन या कायदेशीर वाक्याचा आधार घेऊन स्टॅंडचे बांधकाम बंद करणे योग्य नाही. पेशंटची काळजी वाटणाऱ्यांना या अगोदर हे स्टॅन्ड दिसले नाही का? तरीसुद्धा स्टॅंडच्या मागे आवाज जाणार नाही याची दक्षता घेऊन बांधकाम करणे योग्य आहे. सद्या लहान मुले,वृद्ध, महिला, विद्यार्थी, रुग्ण तसेच इतर प्रवाशांना उन, वारा आणि पावसामध्ये झाडाखाली ताटकळत उभे रहावे लागत आहे. यांना निवाऱ्याची गरज आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून बांधकामासाठी झालेली गुंतवणूक लक्षात घेता काम सुरु करणे काळाची गरज वाटते. बांधकामासाठी कोणतीही कायदेशीर रोख नसताना केवळ एका तक्रार अर्जावरून हे बांधकाम बंद ठेवणे योग्य नाही. केवळ राजकारणासाठी हे सर्व सुरु आहे असे वाटते. त्यामुळे ग्रामपंचायत आणि आजरा आगाराने याचा योग्य व गांभीर्याने विचार करून प्रवाश्यांच्या सेवेसाठी आणि सोयीसाठी हे बांधकाम पूर्णत्वास न्यावे असे म्हटले. या मागणी करीता कॉ. शिवाजी गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धरणे व हलगीनाद आंदोलन सुरु केले आहे.
 

 यावेळी  कॉ. शिवाजी गुरव यांच्यासह महादेव सुतार (प्रवासी संघटना आजरा तालुका अध्यक्ष), रामदास मोरवाडकर (सचिव, प्रवासी संघटना), श्रीमती रोहिणी चौगुले(गडहिंग्लज प्रवासी संघटना),निवृत्ती गजरकर आंदोलनाला बसले आहेत. तर शिरीष देसाई(जि. प. सदस्य), रत्नजा सावंत (बहिरेवाडी सरपंच), रुपालीताई पाटील (आरदाळच सरपंच),महेश करंबळी (उत्तूर ग्रा. पं. सदस्य ), गणपती येसादे, मारुती कुरुणकर, यल्लाप्पा कांबळे, प्रभाकर कांबळे, कृष्णा आजगेकर, सागर सन्ने, नजीर लमतुरे, वनिता तोरस्कर, ऋतुजा चौगुले यांच्यासह अनेक जणांनी पाठिंबा दिला आहे.


*उत्तूरच्या बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम पूर्णत्वासाठी कॉ. शिवाजी गुरव यांचे बेमुदत हलगीनाद व धरणे आंदोलन सुरु
Total Views: 246