बातम्या

*रामदेव गल्ली व कुंभार गल्लीत तातडीने गतिरोधक बनवा-नगरसेविका डॉ. सौ. स्मिता कुंभार यांची मागणी

Construct speed breakers immediately


By nisha patil - 7/20/2026 11:29:29 PM
Share This News:



*रामदेव गल्ली व कुंभार गल्लीत तातडीने गतिरोधक बनवा-नगरसेविका डॉ. सौ. स्मिता कुंभार यांची मागणी
 

आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा शहरातील रामदेव गल्ली व कुंभार गल्ली येथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, या दोन्ही गल्ल्यांमध्ये तातडीने वाहतूक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात. याठिकाणी रस्त्यावर अतिशय तिव्र उतार असल्याने वाहनांचा वेग जास्त असतो त्यामुळे या ठिकाणी गतिरोधकांची  मागणी नगरसेविका डॉ. सौ. स्मिता कुंभार यांनी नगरपंचायत आजराचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
   

 निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, दोन्ही गल्ल्यांमधील रस्ते तीव्र उताराचे असल्याने वाहनांचा वेग नियंत्रित राहत नाही. त्यामुळे या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास सतत धोका निर्माण होत आहे. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
रामदेव गल्लीमध्ये दर आठवड्याला बाजार भरत असल्याने व्यापारी, ग्राहक व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र पावसाळ्यात पावसाचे पाणी गटारातून न वाहता थेट रस्त्यावरून वाहत असल्यामुळे संपूर्ण रस्ता जलमय होतो. परिणामी व्यापारी, ग्राहक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

 

या पार्श्वभूमीवर दोन्ही गल्ल्यांमध्ये रबरी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. गतिरोधकांमुळे वाहनांचा वेग नियंत्रित होईल, अपघाताचा धोका कमी होईल आणि पावसाच्या पाण्याचा वेग कमी होऊन ते गटारात जाण्यासही मदत होईल, असे त्यांनी नमूद केले आहे.
याशिवाय, संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांकडे यापेक्षाही अधिक प्रभावी उपाययोजना उपलब्ध असल्यास त्यांचाही अवलंब करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी आग्रही विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

 

या निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम उपविभाग, आजरा येथील माननीय उपअभियंता यांनाही पाठविण्यात आली असून, संबंधित विभागांनी तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे, निवेदन देतेवेळी डॉ. स्मिता कुंभार  (नगरसेविका), सुधीर कुंभार (भा. ज. प. जिल्हा उपाध्यक्ष ),परशुराम बामणे, (नगरसेवक व अध्यक्ष अन्याय निवारण समिती). किरण कांबळे (माजी नगरसेवक), नौशादभाई बुडडेखान (सामाजिक कार्यकर्ते )उपस्थित होते.


*रामदेव गल्ली व कुंभार गल्लीत तातडीने गतिरोधक बनवा-नगरसेविका डॉ. सौ. स्मिता कुंभार यांची मागणी
Total Views: 54