बातम्या
देवीदास मिसाळ व कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखल
By nisha patil - 8/14/2026 8:58:08 PM
Share This News:
देवीदास मिसाळ व कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखल
दूध संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी दबावाखाली काम केल्याचा आरोप
कोल्हापूर, दि. १४: विभागीय उपनिबंधक (सहकारी संस्था, दुग्ध) श्री. देवीदास मिसाळ आणि सहनिबंधक (दुग्ध, कोल्हापूर) श्री. कृष्णा ठाकरे यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी अवमान याचिका दाखल झाली. करंजफेण ता. राधानगरी येथील श्री. विठ्ठलाई महिला सहकारी दूध व्यवसायिक संस्थेने उच्च न्यायालय सर्किट बेंच, कोल्हापूर येथे ही अवमान याचिका दाखल केली आहे. संस्थेच्यावतीने ॲड. भूषण मंडलिक यांनी ही अवमान याचिका दाखल केली आहे. संस्थेच्या अध्यक्षा सौ. पल्लवी अनुप वाघरे यांनी ही माहिती दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच, कोल्हापूर यांनी दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी पारित केलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावणे, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणे तसेच या संस्थांचा अवसायन आदेश रद्द केलेला असतानाही कच्च्या मतदार यादीमध्ये संस्थेचा समावेश न केल्यामुळे ही अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
दि. २३ जून २०२६ रोजी न्यायालयाने सदर अवसायन आदेशास स्थगिती दिली होती. ही स्थगिती अंतिम निकाल होईपर्यंत म्हणजेच दि. १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत कायम होती. स्थगिती कायम असतानाही त्याचा चुकीचा अर्थ लावून, आपल्या सोयीप्रमाणे जाणीवपूर्वक या संस्थांना मतदानाच्या प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यासाठी व मतदानाचा अधिकार हिरावून घेण्यासाठी राजकीय हेतूने आणि दबावाखाली अवसायनाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संस्थेला पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले आहेत.
मतदार यादीतून बेकायदेशीरपणे वगळल्याचा आरोप.....!
उच्च न्यायालयाने दि. २३ जून व १ जुलै २०२६ रोजी अंतरीम स्थगीती दिली असताना आणि दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अवसायनाचा आदेश पूर्णपणे रद्द केला असतानाही, निवडणूक प्राधिकाऱ्यांनी दि. १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या 'गोकुळ'च्या प्रारूप मतदार यादीतून याचिकाकर्त्या संस्थेसह इतर संस्थांची नावे जाणीवपूर्वक वगळली.
मतदानापासून वंचित ठेवण्यासाठीच.........!
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यापासून दूर ठेवण्याच्या वाईट हेतूनेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ही प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
देवीदास मिसाळ व कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखल
|